Chhaya Kadam : छाया कदम यांना मिळाला फिल्मफेअर पुरस्कार; शाहरुख खाननं मिठी मारून केलं कौतुक!

Chhaya Kadam : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छाया कदम यांनी आणखी एक मोठा सन्मान पटकावला आहे.
अहमदाबादमध्ये पार पडलेल्या 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात छाया कदम यांना ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ हा मानाचा पुरस्कार मिळाला.
हा पुरस्कार त्यांना किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील ‘मंजू माई’ या प्रभावी भूमिकेसाठी मिळाला.
मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान उंचावला
‘मंजू माई’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा असा ठसा उमटवला की संपूर्ण देशात त्यांचं कौतुक झालं.
या पुरस्कारामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा मान आणखी उंचावला आहे.
पुरस्काराची घोषणा होताच, छाया कदम यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं.
शाहरुख खानची मिठी आणि कौतुक
छाया कदम जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेल्या, तेव्हा तिथे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान उपस्थित होता.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर छाया कदम भावूक झाल्या तेव्हा शाहरुखने पुढे येऊन त्यांना मिठी मारली आणि धीर दिला.
शाहरुखने मंचावरून स्वतः त्यांना खाली नेऊन त्यांचं कौतुकही केलं. हा क्षण पाहून प्रेक्षकही भावूक झाले.
View this post on Instagram
पुरस्कार स्वीकारताना छाया म्हणाल्या,
“प्रत्येकवेळी वाटायचं की यावेळी नक्की पुरस्कार मिळेल, पण मिळत नव्हता. यावेळी ठरवलं होतं की मिळो न मिळो, छान तयार होऊन सोहळ्याला जायचं!
किरण राव, तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि एका मराठी मुलीला युपीमधली ‘मंजू माई’ बनवलंस, यासाठी मनापासून आभार.
हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे इंडस्ट्रीत अनेक वर्षे मेहनत करत आहेत आणि स्वतःला विचारतात, ‘मेरा टाइम कब आएगा?’”
छाया कदम यांच्या या सन्मानाने मराठी कलाविश्वात आनंदाची लाट उसळली आहे.
त्यांच्या अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही.
शाहरुख खानसोबतचा त्यांचा हा भावनिक क्षण प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.





