डॉलर उडाला! दोन आठवड्यांत भारताच्या परकीय चलनात 4.1 अब्ज डॉलरची घसरण

मुंबई – शेअर बाजार परदेशी गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. त्याचबरोबर थेट परकीय गुंतवणुकीचे प्रकल्प सध्या फारसे मार्गी लागत नाहीत. अशा परिस्थितीत भारताकडे असलेल्या परकीय चलन साठ्यावर नकारात्मक परिणाम होत आहे.
रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार 18जुलै रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा 1.1 अब्ज डॉलरने कमी होऊन 695 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा तीन अब्ज डॉलरने कमी होऊन 696 अब्ज डॉलर झाला होता. मात्र सध्या असलेला परकीय चलन साठा भारताला जवळजवळ एक वर्ष आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
सप्टेंबरच्या मध्यात भारताकडे असलेला परकीय चलन साठा तब्बल 704 अब्ज डॉलर या पातळीवर गेला होता. त्यावेळी अमेरिकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केली होती आणि आगामी काळातही व्याजदर कपात होणार असे सांगितले होते. अशा परिस्थितीत डॉलर कमकुवत होऊन भारतातील परकीय गुंतवणुकीतवाढ झाली होती.
मात्र त्यानंतर हा साठा बराच कमी झाला होता. आता त्यामध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी गेल्या दोन आठवड्यापासून भारताकडील परकीय चलन साठ्यात घट होत आहे. डॉलर शिवाय भारताकडे परकीय चलन गंगाजळीमध्ये इतर देशांच्या चलनांचा समावेश असतो. चलन बाजारातील दैनंदिन किमतीनुसार या साठ्याचे मूल्यांकन केले जात असते. भारताकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य या आठवड्यात 150 दशलक्ष डॉलरने वाढून 84.4 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे. कारण या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात बरीच वाढ झाली होती.



