मुंबई – जागतिक व्यापार युद्धाच्या काळात अमेरिकेने भारताविरुद्ध 50 टक्के आयात शुल्क सुरू केले आहे. अशा परिस्थितीत भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यावर याचा नकारात्मक परिणाम वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत 22 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 4.3 अब्ज डॉलरने कमी होऊन 690.7 अब्ज डॉलर या पातळीपर्यंत खाली आला. त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा 1.4 अब्ज डॉलरने वाढला होता. मात्र सरलेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूक बरीच कमी झाली. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय कर्जरोखे बाजारातही विक्री केली. शिवाय भारत- अमेरिका संबंध ताणले गेल्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रकल्प सध्या कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताकडील परकीय चलन साठ्यामध्ये घट होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. मात्र भारताकडे सध्या असलेला परकीय चलन साठा किमान एक वर्ष तरी भारताला आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नाही. मात्र जागतिक व्यापार युद्धामुळे रुपयावर जास्तच दबाव आला तर रिझर्व बँकेला हस्तक्षेप करण्यासाठी डॉलरचा वापर करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय परकीय चलन साठ्यावर दबाव येण्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. दरम्यान अमेरिकेला निर्यात कमी होणार असल्यामुळे भारत पर्यायी बाजारपेठाचा शोध घेत आहे. त्यामुळे लघु पल्ल्यात तरी भारताला आयात -निर्यातीच्या आघाडीवर नकारात्मक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली. त्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 465 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 85 अब्ज डॉलरवरवर आले आहे.