भारताची चालू खाते तूट वाढली: व्यापार युद्धाचा फटका, 11.5 अब्ज डॉलरवर पोहोचली पातळी

मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट वाढून राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.1% म्हणजे 11.5 अब्ज डॉलर या पातळीवर गेली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट 10.4 अब्ज डॉलर इतकी होती.
व्यापार युद्ध भडकल्यामुळे भारताची निर्यात कमी झाली आहे. तर खनिज तेल आणि सोन्याच्या आयातीमुळे एकूण आयात जास्त झाली आहे. अशा परिस्थितीत व्यापारातील तूट वाढत आहे. त्याचा परिणाम चालू खात्याच्या तुटीवर होत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
भारताची व्यापारी वस्तू व्यापारातील तूट ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वाढवून 79.2 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. जीकी गेल्या वर्षी तिसर्या तिमाही 71.6 अब्ज डॉलर होती. व्यापारातील आणि चालू खात्यावरील तुट वाढू नये यासाठी वाणिज्य मंत्रालय आणि अर्थमंत्रालय प्रयत्न करत आहे. मात्र सध्याच्या व्यापार युद्धाच्या काळात या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत. ही तूट वाढल्यानंतर रुपयांच्या मूल्यावर दबाव येतो आणि आयात महागात पडत असते.





