Jensen Huang’s resignation : अफेअर भोवलं! एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग यांचा अखेर राजीनामा
Jensen Huang's resignation : चीनच्या कथित गुप्तहेर महिलेशी संबंध आणि कंपनीतील कर्मचाऱ्याशी अफेअरच्या आरोपांमुळे एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग चर्चेत. कोलेट क्रेस्स यांच्या नियुक्तीचे वृत्त आणि FBI तपासाची माहिती जाणून घ्या.

Jensen Huang’s resignation : चीनच्या कथित गुप्तहेर महिलेशी संबंध आणि कंपनीतील महिला कर्मचाऱ्याशी अफेअर असल्याच्या आरोपांमुळे एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग चर्चेत आले आहेत. त्यांनी कंपनीच्या अध्यक्ष, CEO आणि संचालकपदाचा तातडीने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या जागी CFO कोलेट क्रेस्स यांची हंगामी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या वृत्तानंतर एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये प्री-मार्केट व्यवहारात १० टक्क्यांची घसरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
बोर्डाच्या बैठकीनंतर राजीनाम्याची चर्चा –
हुआंग यांच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ बैठक घेत असल्याचे वृत्त होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, हुआंग यांचे मेगास्पीड कंपनीच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याशी जवळचे संबंध होते. या महिलेला चीन सरकारसाठी काम करणारी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच, एनव्हिडियातील एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याशीही हुआंग यांचे संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांबाबत स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
मेगास्पीडकडून अमेरिकेला सहकार्याचे आश्वासन –
या प्रकरणावर मेगास्पीड इंटरनॅशनल कंपनीने भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण कायद्यांचे पालन करण्यास कंपनी गंभीर असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, अमेरिकन सरकारला तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. एनव्हिडियानेही कंपनीची गोपनीय माहिती किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींशी तडजोड झाल्याचा पुरावा नसल्याचे म्हटले आहे. उपलब्ध माहितीची तपासणी केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
FBI कडूनही तपास –
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, मेगास्पीडमधील एलिस हुआंग (हुआंग ले) या वरिष्ठ अधिकारी होत्या. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना त्या चीनमधील बीजिंग प्रशासनाला माहिती देत असल्याचा संशय असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाची FBI चौकशी करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, जेन्सन हुआंग आणि संबंधित महिला यांच्यातील संबंध तसेच कथित गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीबाबत अद्याप स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही.
चीनला चिप्स पाठवल्याचा आरोप –
मेगास्पीडवर एनव्हिडियाच्या प्रगत संगणक चिप्स बेकायदेशीरपणे चीनला पाठवल्याचा आरोप यापूर्वी झाला होता. मात्र, डिसेंबरमध्ये कंपनीने अशा निर्यातीचा पुरावा नसल्याचे सांगितले होते. सिंगापूरनेही या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. चीनने हुआंग यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फेटाळला आहे.
एनव्हिडिया ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या चिप्स तयार करणारी जगातील प्रमुख कंपनी आहे. चीनला चिप्स विकण्यावरील अमेरिकेचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी हुआंग यांनी यापूर्वी केली होती. जानेवारीमध्ये ट्रम्प प्रशासनाने एनव्हिडियाच्या H200 चिप्स चीनला विकण्यास परवानगी दिल्याचे वृत्त होते.





