Kumamoto Masters Japan 2024 | कुमामोटो मास्टर्स जपान सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान गुरुवारी संपुष्टात आले आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत 20व्या क्रमांकावर असलेली सिंधू ही या स्पर्धेतील शेवटची भारतीय खेळाडू होती. तिच्या आधी लक्ष्य सेन याला एकेरीत तर त्रिसा जॉली अन् गायत्री गोपीचंद यांना महिला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी, पी.व्ही.सिंधूनं थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-12, 21-8 असा सरळ गेममध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
उप-उपांत्यपूर्व फेरीत पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधूने तिची लय गमावली आणि कॅनडाच्या मिशेल लीने तिला 17 – 21, 21 – 16, 21 – 17 असं पराभूत केले. सुमारे दीड तास चाललेल्या या सामन्यात पहिल्या गेममध्ये बरोबरीची स्पर्धा होती. सिंधूने 11-8 ची आघाडी घेतली आणि त्यानंतर सलग आघाडी कायम ठेवत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये लीने अतिशय आक्रमक खेळ करत 8-3 अशी आघाडी घेतली. पण सिंधूने पुनरागमन करत स्कोअर 16-16 असा केला. यानंतर लीने सलग पाच गुण मिळवत गेम जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये एकवेळ 17-17 अशी बरोबरी होती पण लीने सलग चार गुण मिळवून सामना जिंकला. सिंधूच्या साध्या चुकांमुळे तिचे काम सोपे झाले. आता पुढील फेरीत मिशेल ली हिच्यासमोर दक्षिण कोरियाच्या यू जिन सिमचे आव्हा असणार आहे.
Kumamoto Masters Japan 2024 | त्रिशा-गायत्री जोडीचं पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात…
लक्ष्य आणि त्रिशा-गायत्री जोडीचीही निराशा…
दरम्यान, लक्ष्य सेनला पहिल्या फेरीत मलेशियाच्या लिओंग जुन हाओविरुद्ध 22-20, 17-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीला मंगळवारी पहिल्या फेरीत (Round of 32) चायनीज तैपेई जोडीकडून सरळ गेममध्ये 16-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला होता.