डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भारताचे मोठे पाऊल

वॉशिंग्टन – करोनावर अद्याप औषध सापडले नसले तरी मलेरियावरील काही औषधे यावर उपयोगी ठरत असल्याचे समोर आले आहे. यामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधाची मागणी वाढली आहे. अमेरिकेनेही भारताकडे या औषधाच्या निर्यातीची मागणी केली होती. मात्र भारताने या औषधाच्या निर्यातीवर याआधीच बंदी घातली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या पुरवठयावरुन इशारा दिला होता. अमेरिकेच्या दबावानंतर आता मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
जागतिक महासत्ता असलेली अमेरिका करोना विषाणूच्या वेढ्यात सापडली आहे. करोना व्हायरसच्या उपचारांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्विन या गोळया प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी शनिवारी या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. मात्र, सोमवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्यात येईल, अशी धमकीवजा इशारा दिला होता.
यानंतर भारत सरकारने व्हिटॅमिन बी 1 आणि बी 12 यासह 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे आता ही औषधे निर्यात केली जातील. मात्र पॅरासिटामॉल आणि त्यापासून बनविलेल्या इतर औषधांवर निर्यातीवरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.





