जगात भारी भारताची लोकशाही: अमेरिकेने केले कौतुक !

John Kirby on India’s Democracy – जगात भारतापेक्षा अन्य ज्वलंत लोकशाही नाही, असे मत व्हाईट हाऊसने व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भारतीयांनी मतदानाचा अधिकार बजावल्याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे सल्लागार जॉन किर्बे यांनी भारतीयांचे कौतुक देखील केले आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांमध्ये ५४५ लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी तब्बल ९६९ दशलक्ष नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे गौरवोद्गार काढले.
जगात भारतासारखी ज्वलंत अन्य लोकशाही नाही. मतदान करण्याची क्षमता आणि भविष्यातील सरकारबद्दलची सजगता सर्वांना माहीती आहे. भारतीय योग्य प्रक्रीया पार पाडतील अशी आम्हाला आशा आहे, असेही किर्बे म्हणाले..
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका संबंधांची जपणूक केली गेली आहे. विशेषतः गेल्या तीन वर्षात बायडेन प्रशासनाच्या कार्यकाळात हे संबंध जपले गेले आहेत, असेही ते म्हणाले.
भारताबरोबर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले गेले आहेत. महत्वाच्या तांत्रिक उपक्रमांबद्दल एकत्रितपणे काम केले जात आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात हे सहकार्य वाढवले जाते आहे. लोकांमधील थेट संपर्क वाढवला जातो आहे. त्या गटाचा भारतही एक सदस्य आहे, असेही किर्बे म्हणाले.
भारत आणि जपान हे देश झेनोफोबिक असल्याचे मत अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केले होते. त्याला मात्र किर्बे यांनी नकार दिला. अध्यक्ष बायडेन हे व्यापक अर्थाने बोलत होते, अशी सारवासारव किर्बे यांनी केली. या महिन्याच्या सुरुवातीला बायडेन यांनी जपान आणि भारताला झेनोफोबिक देश असल्याचे म्हटले होते. या दोन्ही देशांना बायडेन यांनी रशिया आणि चीन सारख्या ज्यांना स्थलांतरित नको आहेत, असे देश म्हणून समूहबद्ध केले होते.





