भारतीयांना लागले स्मार्टफोनचे व्यसन? दिवसाला स्क्रीनसमोर घालवतात तब्बल ‘एवढे’ तास

Smartphone Addiction | सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी संवाद साधण्यापासून ते शॉपिंगसह शेकडो कामे स्मार्टफोनच्या मदतीने करणे शक्य होते. मात्र, स्मार्टफोनचा वापर एवढा वाढला आहे की याचे भारतीयांना एकप्रकारे व्यसन तर लागले नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागचे कारण म्हणजे 2024 मध्ये भारतीयांनी तब्बल 1.1 लाख कोटी तास एवढा वेळ केवळ स्मार्टफोन बघण्यात घालवला आहे.
मॅनेजमेंट कन्सल्टंट EY च्या रिपोर्टमध्ये याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीयांनी एकूण 1.1 लाख कोटी तास आपल्या स्मार्टफोनवर घालवले आहेत. स्वस्त इंटरनेटमुळे जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात इंस्टाग्रामपासून नेटफ्लिक्सपर्यंतचे शेकडो प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध झाले आहेत.
EY च्या रिपोर्टनुसार, भारतीय नागरिक दररोज सरासरी 5 तास मोबाइल स्क्रीनसमोर घालवतात. यातील जवळपास 70% वेळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खर्च करतात. याचा सर्वाधिक फायदा मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला झाला आहे. फोनवर व्हीडिओ पाहण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की, याने पहिल्यांदाच टेलिव्हिजनला मागे टाकले आहे.
मात्र, स्मार्टफोन वापरण्यामध्ये भारतीयांचा क्रमांक इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या नागरिकांनंतर तिसरा आहे. देशातील सुमारे 40% लोक, म्हणजेच 56.2 कोटी लोक आता स्मार्टफोन वापरतात. हा आकडा अमेरिका आणि मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
2024 मध्ये 5G सब्सक्रिप्शन दुप्पट वाढून 27 कोटींवर पोहोचले आहे. तर 40% इंटरनेट यूजर्स ग्रामीण भागातील आहेत. स्मार्टफोनच्या वापरामुळे टेलिव्हिजन, प्रिंट आणि रेडिओचा महसूल देखली कमी झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.



