Smartphone Addiction: सकाळी उठताच मोबाइल वापरता ? शरिरावर होऊ शकतात ‘हे’ भयंकर परिणाम

Harmful Effects of Mobile Phones: दिवसभर आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने स्मार्टफोन वापर असतो. स्मार्टफोनच्या मदतीने बहुतांशकामे अगदी मिनिटात पूर्ण होतात. मात्र, या डिव्हाइसचा काहीजण अतिप्रमाणात वापर करतात. अगदी झोपेतून उठल्या उठल्या मेसेज पाहणे, व्हीडिओ पाहणे अशा गोष्टी बऱ्याचजणांकडून केल्या जातात. मात्र, मोबाइलच्या या अतिवापराचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही देखील सकाळी उठल्या उठल्या स्मार्टफोन चेक करत असाल तर ही सवय बदलायला हवी.
झोपेवर होईल परिणाम
तुम्ही जर रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्वरित मोबाइल पाहत असाल तर याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. झोपेत असताना मेंदू शांत असतो. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर मोबाइल पाहिल्यास त्यावर अचानक ताण येतो. झोपेतून उठल्यानंतर सुरूवातीची काही मिनिटे मेंदू पूर्णपणे सक्रिय नसतो. मात्र, अचानक ताण आल्याने मेंदूमधील नसांना नुकसान पोहोचते. हा प्रकार वारंवार घडत असल्यास झोपेवर याचा परिणाम दिसून येतो.
मोबाइल ठरतोय तणावाचे कारण
दिवसभर थकवा, तणाव जाणवत असेल तर यामागचे प्रमुख कारण तुमचा स्मार्टफोन आहे. सकाळी उठल्यानंतर नॉटिफिकेशन तपासतो. अशावेळी एखादी नकारात्मक माहिती असल्यास याचा तुमच्यावर परिणाम होतो व संपूर्ण दिवस खराब जातो. तसेच, मोबाइल वापरल्यामुळे रात्री कमी झोप झाली असल्यास दिवसभर थकवा जाणवतो.
उत्पादक क्षमता होईल कमी
दिवसभरातील सर्वात महत्त्वाची वेळ सकाळी असते. तुम्ही सकाळी उठून व्यायाम करू शकता, पुस्तक वाचू शकता अथवा दिवसभर कोणती कामे करायची आहेत, त्याची यादी तयार करू शकता. मात्र, हाच महत्त्वाचा वेळ मोबाइलमध्ये घालवल्यास याचा तुमच्या उत्पादक क्षमतेवर परिणाम होतो. तुमचा बहुतांशवेळ मोबाइलमध्ये गेल्याने कोणतेही काम करणे शक्य होत नाही.
डोळ्यांवर होईल परिणाम
स्मार्टफोनचा वापर एवढा वाढला आहे की आज बहुतांश व्यक्तींच्या डोळ्यावर चष्मा पाहायला मिळतो. सकाळी उठल्या उठल्या स्मार्टफोन वापरल्याने डोळ्यांची आग होणे, अंधुक दिसणे, सूज येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मोबाइल वापरणे टाळायला हवेच, सोबतच तुमचा दिवसभरातील स्क्रीनटाइम देखील कमी करायला हवा.





