डोपिंगप्रकरणी खेळाडूसोबत प्रशिक्षकही ठरणार दोषी

भारतीय कुस्ती महासंघाचा कठोर निर्णय
नवी दिल्ली – जर एखादा खेळाडू डोपिंगमध्ये (उत्तेजक चाचणी) दोषी सापडला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. काही वेळेला बंदी आणि दंड भरावा लागतो, तर काही वेळा दोषी खेळाडूवर आजीवन बंदीही घालण्यात येते, पण आता मात्र यामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. यापुढे उत्तेजक चाचणीत कुस्तीपटू दोषी आढल्यास त्याचे प्रशिक्षक आणि अन्य साहाय्यक मार्गदर्शकांवर बंदीची कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी घेतला.
उत्तेजकांचे सेवन करून कुस्ती या खेळाला काळिमा फासणाऱ्या खेळाडूंवर संघटनेकडून कारवाई होते. परंतु त्यांचे प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शकसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले.
जागतिक कुस्ती संघटनेला मोठा आर्थिक दंड भरावा लागल्यामुळे भारतीय संघटनेनेही हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय शिबिरात कोणत्याही खेळाडूकडे बंदी असलेली उत्तेजके आढळल्यास प्रशिक्षकाला निलंबित करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कुस्तीपटू डोपिंगमध्ये आढळल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली. पण या प्रकरणांमुळे भारताच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ठपका बसल्याचे म्हटले गेले. त्यामुळे यापुढे जर कुस्तीपटू दोषी आढळला तर त्यासाठी प्रशिक्षकांनाही दोषी ठरवण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.
याबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, जर एखादा कुस्तीपटू राष्ट्रीय शिबिरापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याचे प्रशिक्षकही दोषी ठरतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जर एखादा खेळाडू प्रशिक्षकाचे ऐकत नसेल, तर त्या प्रशिक्षकांनी ही गोष्ट महासंघाला कळवायला हवी. आम्हाला ही गोष्ट कळल्यावर आम्ही त्याच्यावर उचित कारवाई करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.





