ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला !

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला असून वांशिक विद्वेषातून हा हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चरणजीत सिंग असे हल्ला झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
किंटोर ॲव्हेन्यू येथील पार्किंगमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर काही जणांच्या गटाने २३ वर्षीय चरणजीत सिंग याच्यावर हा प्राणघातक हल्ला केला. या हल्लेखोरांनी आपल्याला वांशिक शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण केल्याचे चरणजीत सिंग याने सांगितले आहे.
या मारहाणीनंतर तो बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्या डाव्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे. त्याच्या जबड्यालाही मार बसला आहे. डोक्याला असलेली सूज अजूनही कमी झालेली नाही, असे त्याने म्हटले आहे.
या घटनेनंतर एनफिल्डमधील एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर मारहाण करून गंभीर इजा पोहोचवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या इतर हल्लेखोरांबद्दल माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे.





