नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरुद्धची व्यापारासंदर्भातील भूमिका अधिक नकारात्मक केल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून शेअरची विक्री वाढली आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारानी 3,351 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अशा परिस्थितीत सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 386 अंकांनी कोसळून 81,725 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 112 अंकांनी म्हणजे 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 25,056 अंकावर बंद झाला. ज्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली, त्यामध्ये टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, अॅक्सिस बँक या कंपन्याचा समावेश आहे. एनटीपीसी, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेने कर्मचारी व्हिसावरील शुल्क वाढविण्याअगोदर भारतामध्ये सकारात्मक वातावरण होते. मात्र अमेरिकेने शुल्क वाढविल्यानंतर विविध क्षेत्रावर याचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत आहे. जीएसटी दरात बरीच कपात करूनही निर्देशांक वाढत नाहीत. आता गुंतवणूकदारांचे लक्ष दुसर्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे आहे. दरम्यानच्या काळात भारत- अमेरिका संबंध सुधारतील अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. अमेरिकेचे धोरण कमालीचे संदीग्ध आहे. अमेरिका कोणत्या वेळी काय निर्णय घेईल याची गुंतवणूकदारांना शास्वती नाही. त्यासाठी एक तर गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत किंवा कुंपणावर बसून आहेत. फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सध्या जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेसह विविध शेअर बाजाराच्या निर्देशांकावर नकारात्मक परिणाम झाला.