Stock Market Today : शेअर बाजारात तेजीचा धडाका! आज सेन्सेक्स 1718 अंकांनी उसळला; निफ्टी पुन्हा 25 हजारांवर
Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी. सेन्सेक्स १,७१८ अंकांनी वाढून ८१,०२८ वर, तर निफ्टी २५,०३० अंकांवर बंद. परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि कच्च्या तेलाच्या घसरणीचा बाजाराला आधार.

Stock Market Today : जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होत असतानाही भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (६ नोव्हेंबर) तेजीची घोडदौड कायम ठेवली. सेन्सेक्स तब्बल १,७१८ अंकांनी वधारला, तर निफ्टीने पुन्हा २५ हजारांचा टप्पा पार केला. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. भारतीय बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी नोंदवण्यात आली.
शुक्रवारी व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स १,७१८.०१ अंकांनी म्हणजेच २.१७ टक्क्यांनी वाढून ८१,०२८.०२ अंकांवर बंद झाला. दिवसभरातील हा उच्चांक होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी ४९३.७५ अंकांनी म्हणजेच २.०१ टक्क्यांनी वधारून २५,०३०.३५ अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये सर्वाधिक ६.१५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीने गुरुवारी जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २५ टक्क्यांची वाढ नोंदवली. कंपनीचा नफा ४,५८७.८८ कोटी रुपयांवर पोहोचला. वाहन व्यवसायातील चांगल्या कामगिरीमुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टायटन, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. मात्र, सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिडचा शेअर घसरला.
सात दिवसांत सेन्सेक्स ७,७८२ अंकांनी वधारला –
भारतीय शेअर बाजारातील तेजीचे सात सत्रांपासूनचे सत्र सुरूच आहे. गेल्या सात व्यवहारांच्या दिवसांत सेन्सेक्समध्ये एकूण ७,७८१.९९ अंकांची म्हणजेच १०.६२ टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी २,३३१.५ अंकांनी म्हणजेच १०.२७ टक्क्यांनी वधारला आहे. गुरुवारीही सेन्सेक्स २,००८.६१ अंकांनी वाढून ७९,३१०.०१ अंकांवर, तर निफ्टी ५७६ अंकांनी वाढून २४,५३६.६० अंकांवर बंद झाला होता.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी –
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली. ब्रेंट क्रूड तेलाचा दर १.५० टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल ९६.८२ डॉलरवर आला. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी भारतीय शेअर बाजारात १४,९७४.६८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. या खरेदीचाही बाजारातील तेजीला आधार मिळाला.
जागतिक बाजारांमध्ये मात्र मोठी घसरण –
भारतीय बाजारात तेजी असताना आशियाई आणि अमेरिकन बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ६.०२ टक्क्यांनी, तर जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ५.९६ टक्क्यांनी घसरला. चीनचा शांघाय आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही एक टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीसह बंद झाले. युरोपमधील बाजारांमध्येही नकारात्मक व्यवहार सुरू होते.
अमेरिकेतील बाजारांनाही गुरुवारी मोठा फटका बसला. नॅस्डॅक निर्देशांक ५.५२ टक्क्यांनी, एस अँड पी ५०० निर्देशांक ४.३६ टक्क्यांनी, तर डाऊ जोन्स ३.४४ टक्क्यांनी घसरला.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, जागतिक बाजारांमध्ये मोठी घसरण होत असतानाही भारतीय शेअर बाजाराने तेजी कायम ठेवली. परदेशातील अस्थिर परिस्थितीच्या तुलनेत भारतीय बाजार अधिक सुरक्षित असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सची मोठी विक्री आणि नियमन अधिक कठोर होण्याच्या शक्यतेमुळे तेथील बाजारावर दबाव निर्माण झाला.




