Stock Market : शेअर बाजारात ‘दिवाळी धमाका’; ‘या’ कराणामुळे सेन्सेक्स तब्बल 2000 अंकांनी उसळला
Stock Market : भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी तेजी. सेन्सेक्स २,००८ अंकांनी वाढून ७९,३१० वर, तर निफ्टी २४,५३६ वर बंद. अमेरिकेतील निवडणूक निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीचा बाजाराला आधार.

Stock Market : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (५ नोव्हेंबर) सलग सहाव्या दिवशी मोठी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २,००८.६१ अंकांनी वाढून ७९,३१०.०१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७६ अंकांची वाढ नोंदवत २४,५३६.६० वर पोहोचला.
कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, पश्चिम आशियातील संघर्ष संपण्याची आशा आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली खरेदी आणि अमेरिकेतील शेअर बाजारातील तेजीचाही भारतीय बाजाराला फायदा झाला.
व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने २,१६८.६३ अंकांची वाढ नोंदवत ७९,४७०.०३ या उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी बजाज फायनान्सचा शेअर सर्वाधिक ७.७७ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ इंटरग्लोब एव्हिएशन ५.८० टक्के, आयसीआयसीआय बँक ५.२९ टक्के, मारुती ५.२८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ५.१५ टक्के आणि बजाज फिनसर्व्ह ४.६६ टक्क्यांनी वाढले. मात्र, एनटीपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी पोर्ट्स आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹७ लाख कोटींची वाढ –
एका व्यवहाराच्या दिवसापूर्वी म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बीएसईवर (BSE) सूचिबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) ₹४,९४,४२,१४०.६२ कोटी होते. आज म्हणजेच ५ नोव्हेंबर २०२६ रोजी यामध्ये वाढ होऊन ते ₹५,०१,५७,३७९.२८ कोटींवर पोहोचले आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात तब्बल ₹७,१५,२३८.६६ कोटींची भर पडली आहे.|
गेल्या सलग सहा सत्रांमध्ये सेन्सेक्सने ६,०६३.९८ अंकांची म्हणजेच ८.२७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर निफ्टी १,८३७.७५ अंकांनी म्हणजेच ८ टक्क्यांनी वधारला आहे.
दरम्यान, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात ७,२८४.०३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यामुळे बाजारातील तेजीला आणखी बळ मिळाले.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मध्यावधी निवडणुकीत मोठा धक्का बसला. डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवले. टेक्सास, जॉर्जिया, आयोवा आणि ओहायो यांसारख्या रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यांमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला. या निकालांचा जागतिक बाजारांवर सकारात्मक परिणाम झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचा भाव १.५९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९६.१२ डॉलरवर होता. आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई घसरले. तर चीनचा शांघाय आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक वाढीसह बंद झाला. युरोपमधील बाजारांमध्येही तेजी होती.
अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक बुधवारी ३.०३ टक्के, एस अँड पी ५०० निर्देशांक १.५८ टक्के आणि नॅस्डॅक १.४४ टक्क्यांनी वाढून बंद झाले. या तेजीचाही भारतीय बाजाराला आधार मिळाला.





