भारतीय मानांकन टेनिस : नीरज, श्रावणी यांना विजेतेपद

पुणे – एमएसएलटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने तर, मुलींच्या गटात श्रावणी देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत बिगरमानांकीत पुण्याच्या श्रावणी देशमुख हिने चौथ्या मानांकित नवी मुंबईच्या सेरेना रॉड्रिक्सचा 7-5, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1 तास 55 मिनिटे चालला. सामन्यात दहाव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे 5-5 अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर श्रावणीने बॅकहॅण्डचे सुरेख फटके मारत अकराव्या गेमला सेरेनाची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
दुसऱ्या सेटमध्ये श्रावणीने आपला दबदबा कायम ठेवत चौथ्या व सहाव्या गेममध्ये सेरेनाची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. श्रावणी ही नववी इयत्तेत सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत असून महाराष्ट्र मंडळ येथे प्रशिक्षक धरणीधर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात नीरज रिंगणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत पुण्याच्या अर्चित धूतचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. नीरज हा आठवी इयत्तेत नाथ व्हॅली स्कूलमध्ये शिकतो प्रशिक्षक रुपेश रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
विजेत्या खेळाडूंना करंडक व आठ एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व सहा एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक म्हाळुंगेचे उपसरपंच विवेक खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रवीण झिटे, प्रणव वाघमारे आणि स्पर्धा निरीक्षक तेजल कुलकर्णी आदी
उपस्थित होते.
सविस्तर निकाल
मुले – अंतिम फेरी – नीरज रिंगणगावकर (1) वि. वि. अर्चित धूत 6-2, 6-2. मुली – अंतिम फेरी – श्रावणी देशमुख वि. वि. सेरेना रॉड्रिक्स (4) 7-5, 6-3.





