आता रेल्वेच्या सर्व सुविधा मिळणार एकाच ठिकाणी, लाँच झाले ‘हे’ खास अॅप, पाहा डिटेल्स

SwaRail App: रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुविधेसाठी एक खास अॅप लाँच केले आहे. मंत्रालयाने SwaRail नावाचे नवीन सुपर अॅप आणले असून, याद्वारे प्रवाशांना एकाच ठिकाणी अनेक सेवांचा फायदा मिळणार आहे. Centre for Railway Information Systems (CRIS) ने हे अॅप तयार केले असून, प्ले स्टोरवर डाउनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे.
सध्या प्रवाशांना रेल्वेशी संबंधित सेवांसाठी वेगवेगळे अॅप वापरावे लागते. मात्र, आता या नवीन अॅपमुळे सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील. याच्या मदतीने प्रवासी रिझर्व्हेशन आणि अनरिझर्व्ह्ड तिकिटं बुक करू शकतील.
SwaRail अॅपवर मिळतील या सुविधा
SwaRail अॅपवर प्रवाशांना रिझर्व्हेशन तिकिट बुकिंग, अनरिझर्व्ह्ड तिकिट बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकिट, पार्सल बुकिंग, PNR स्टेटसची माहिती आणि फूड ऑर्डर आणि तक्रार नोंदणी या सर्व सुविधा मिळतील.
रेल्वेच्या या नव्या सुपर अॅपमध्ये युजर्सना ट्रॅव्हल असिस्टंट फीचर देखील मिळणार आहे. याद्वारे सिंगल साइन-ऑन, ऑनबोर्डिंग आणि विविध प्रवासी सेवा उपलब्ध असतील. तसेच, अॅपसाठी वेगवेगळे लॉग इन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. सुरुवातीला काही महत्त्वाची माहिती भरल्यानंतर प्रवासी या सर्व सुविधा वापरू शकतील.
सध्या या अॅपचे बीटा व्हर्जन अँड्राइड आणि अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. याचे स्टेबल व्हर्जन यूजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल, याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. जे प्रवाशी वारंवार रेल्वेने प्रवास करतात अथवा संबंधित सेवा वापरतात, त्यांच्यासाठी हे अॅप खूपच उपयोगी ठरेल.


