ICC T20I Rankings : आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा! ‘या’ तीन खेळाडूंनी पटकावलं अव्वल स्थान

वरुण चक्रवर्ती गोलंदाजीत अव्वल –
गेल्या आठवड्यात जगातील नंबर एक गोलंदाज बनलेल्या वरुण चक्रवर्तीने 14 रेटिंग गुणांची कमाई करत 747 गुणांसह अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात त्याने गोलंदाजी रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदने 12 स्थानांची झेप घेत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमाननेही सहा स्थानांची प्रगती करत अव्वल दहामध्ये पुनरागमन केले आहे. त्याने आशिया कपमधील गेल्या दोन सामन्यांत 8 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतले.
हार्दिक पंड्या अष्टपैलूंच्या यादीत अव्वल –
अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पांड्या पहिल्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजी रँकिंगमध्ये त्याने सहा स्थानांची प्रगती करत 60 वे स्थान मिळवले आहे. अफगानिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! युथ वनडेत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
अभिषेक शर्मा फलंदाजीत अव्वल –
फलंदाजी रँकिंगमध्ये सलामीवीर अभिषेक शर्माने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. त्याने ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 74 धावांची मॅचविनिंग खेळी केली. पाकिस्तानविरुद्ध 19 चेंडूत नाबाद 30 धावा करणारा तिलक वर्मानेही तीन स्थानांची प्रगती केली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव एका स्थानाच्या सुधारणेसह अव्वल पाचमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ आहे.
हेही वाचा – Sourav Ganguly : सौरव गांगुलीचे दमदार पुनरागमन, पुन्हा अध्यक्षपदी विराजमान; पदभार स्वीकारताच केली मोठी घोषणा
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंना फायदा
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध 45 चेंडूत 58 धावांची खेळी करत 31 स्थानांची झेप घेत 24 व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. श्रीलंकेविरुद्ध धैर्यपूर्ण खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून देणारा हुसैन तलत 234 व्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशचा सैफ हसनने सुपर फोर टप्प्यातील सामन्यात 61 धावांची खेळी करत 133 स्थानांची प्रगती करून 81 व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.





