#ENGvIND 2nd Test : राहुलचा अनोखा विक्रम

लंडन – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात दमदार शतकी खेळी करताना सहाव्या शतकाची नोंदही केली. मात्र, त्याचबरोबर त्याने सहा नवे विक्रमही साकार केले.
या खेळीने तो सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीमध्ये 24 व्या स्थानी आला आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मन्सूर अलीखान पतौडी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोघांनीही कसोटीमध्ये प्रत्येकी सहा शतके फटकावली आहेत.
सलामीवीर म्हणून राहुलचे हे परदेशातील चौथे शतक ठरले. आशिया खंडाबाहेरील देशांमध्ये सर्वाधिक शतके करणारा राहुल भारताचा दुसराच फलंदाज आहे. त्यापूर्वी विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी 15 शतके नोंदवली आहेत.
लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर शतक साकारणारा राहुल हा 10 वा फलंदाज ठरला. कर्नल दिलीप वेगसरकर यांनी या मैदानावर सर्वाधिक तीन शतके फटकावत विक्रम साकार केला आहे. सौरव गांगुली, राहुल द्रविड, महंमद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, अजिंक्य रहाणे आणि अजित आगरकर यांनीही अशी कामगिरी केली आहे.





