Abdur Rehman : पाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने एकही बॉल न टाकता दिल्या ८ धावा! पंचांनी मध्येच रोखलं आणि करिअरच संपलं!

Abdur Rehman Unwanted Record in Cricket : क्रिकेटच्या मैदानात दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित होतात. काही विक्रम अभिमानास्पद असतात, तर काही एखाद्या कलंकासारखे खेळाडूच्या नावावर कायमचे कोरले जातात. असाच एक अनोखा आणि नकोसा वाटणारा विक्रम पाकिस्तानचा माजी फिरकीपटू अब्दुर रहमान याच्या नावावर आहे. सामन्यात एकही वैध चेंडू (Legal Ball) न टाकता सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम अब्दुर रहमानने केला आहे.
नेमकं काय घडलं होतं? (० चेंडू, ८ धावा)
ही घटना २०१४ च्या आशिया चषकातील आहे. मीरपुर येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू होता. बांगलादेशच्या डावातील ११ वे षटक टाकण्यासाठी कर्णधाराने अब्दुर रहमानच्या हातात चेंडू दिला. मात्र, त्यानंतर जे घडले ते क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडले नव्हते:
- पहिला चेंडू: रहमानच्या हातातून चेंडू सटकला आणि तो फलंदाजाच्या कमरेच्या वरून गेला (बीमर). पंचांनी ‘नो बॉल’ घोषित केला.
- दुसरा चेंडू: पुन्हा एकदा त्याने तोच प्रकार केला. कमरेच्या वर फुलटॉस गेल्यामुळे पंचांनी दुसरा ‘नो बॉल’ दिला. या चेंडूवर फलंदाजाने १ धावही काढली.
- तिसरा चेंडू: सहसा दोन बीमरनंतर गोलंदाजाला गोलंदाजीपासून रोखले जाते, मात्र फिरकीपटू असल्याने पंचांनी त्याला तिसरा मौका दिला. पण रहमानने पुन्हा बीमर टाकला आणि त्यावर फलंदाजाने चौकार मारला.
यानंतर पंचांनी तात्काळ रहमानला गोलंदाजी करण्यापासून रोखले आणि त्याला मैदान सोडावे लागले. अशा प्रकारे त्याने अधिकृतपणे एकही चेंडू न टाकता ८ धावा (३ नो बॉल + १ धाव + ४ धावा) खर्च केल्या.
करियरचा शेवट आणि रेकॉर्ड –
विशेष म्हणजे, तो सामना अब्दुर रहमानच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरला. या सामन्यानंतर त्याला पुन्हा कधीही पाकिस्तानच्या वनडे संघात स्थान मिळाले नाही. अब्दुर रहमानने २२ कसोटी सामन्यांत ९९ विकेट्स, ३१ वनडेत ३० विकेट्स आणि ८ टी-२० सामन्यांत ११ विकेट्स घेतले आहेत. तो २०११ च्या विश्वचषक खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाचाही भाग होता.





