US-Israel-Iran War: ओमानजवळ ऑईल टँकरवर भीषण हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू, मध्य-पूर्वेत तणाव वाढला
US-Israel-Iran War: भारतीय दूतावासने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ते ओमानच्या सुरक्षा यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत आहेत.

US-Israel-Iran War: मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय नागरिकांनाही बसू लागला आहे. ओमानच्या राजधानी मस्कटजवळ समुद्रात एका तेलवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यात एका भारतीय क्रू सदस्याचा मृत्यू झाला आहे. ‘एमकेडी व्योम’ (MKD VYOM) असे या जहाजाचे नाव असून ते मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखाली कार्यरत होते. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट सुल्तान काबूसच्या उत्तर-पश्चिम समुद्री क्षेत्रात एका स्फोटकांनी भरलेल्या मानवरहित बोटीने (Unmanned Boat) या तेल टँकरला जोरात धडक दिली. या भीषण धडकेमुळे जहाजावर मोठा स्फोट झाला, ज्यात एका भारतीय नागरिकाचा प्राण गेला. विशेष म्हणजे, इराण आणि अमेरिका यांच्यातील ताज्या तणावानंतर एखाद्या भारतीय नागरिकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
जहाजावर एकूण २१ कर्मचारी तैनात –
ज्या वेळी हा हल्ला झाला, तेव्हा जहाजावर एकूण २१ कर्मचारी तैनात होते. यामध्ये १६ भारतीय, ४ बांगलादेशी आणि एका युक्रेनियन नागरिकाचा समावेश होता. या घटनेनंतर काही कर्मचारी बेपत्ता असल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यांनी स्थानिक ओमान प्रशासनाशी संपर्क साधला आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सध्या समुद्रात मोठे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
हेही वाचा – कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमाने कोसळली
भारतीय दूतावासने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, ते ओमानच्या सुरक्षा यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत आहेत. सुरक्षित राहिलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मदत पुरवून त्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. दरम्यान, या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





