US fighter jets: कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमाने कोसळली
US fighter jets: दरम्यान, इराणकडून करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. कुवेतमधील 'कॅम्प अरिफजान' येथील तळावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे ३ जवान ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

US fighter jets: मध्यपूर्वेतील तणावाचे रूपांतर आता भीषण युद्धात झाले असून खाडी देशांमध्ये सध्या अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून, कुवेती हवाई संरक्षण दलाच्या ‘फ्रेंडली फायर’मध्ये अमेरिकेची तीन ‘F-15E स्ट्राईक ईगल’ लढाऊ विमाने चुकून पाडण्यात आली आहेत.
या घटनेमुळे लष्करी वर्तुळात खळबळ उडाली असून अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानातील सहाही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा मुकाबला करत असताना हा तांत्रिक गोंधळ उडाल्याने ही विमाने कोसळली.
अमेरिकेचे ३ जवान ठार, ५ जण गंभीर-
दरम्यान, इराणकडून करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. कुवेतमधील ‘कॅम्प अरिफजान’ येथील तळावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे ३ जवान ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर कुवेतमधील अमेरिकन दूतावासाच्या परिसरालाही इराण आणि इराण समर्थक गटांच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे.
Good news for IRAN💪
American fighter jets shoot down…
Crash in Kuwait 💪💪 pic.twitter.com/6hJseUFRXr
— Iran’s Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) (@IranMilittary) March 2, 2026
शनिवारी आणि रविवारी झालेल्या या हल्ल्यांमध्ये कुवेतमधील तीन महत्त्वाच्या ठिकाणांचे नुकसान झाले असून त्यात उपग्रह दळणवळण यंत्रणांचाही समावेश आहे. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यावसायिक टर्मिनलवरही हल्ला झाला असून सध्या संपूर्ण खाडी क्षेत्रात विमान वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी सुमारे ६ हजार उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार-
या युद्धाची ठिणगी शनिवारी पडली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त एअरस्ट्राइक करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी आणि राजकीय नेत्यांना ठार केले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. इराणमधील रेड क्रिसेंट सोसायटीच्या अहवालानुसार, आतापर्यंत या संघर्षात ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दक्षिण इराणमधील मिनाब येथील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात १७५ जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
अमेरिकेच्या संपूर्ण मध्यपूर्वेतील तळांना धोका –
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत ‘एकाच फटक्यात ४८ नेत्यांचा खात्मा’ केल्याचा दावा केला असला तरी, इराणच्या प्रतिहल्ल्याने अमेरिकेच्या संपूर्ण मध्यपूर्वेतील तळांना धोका निर्माण झाला आहे. कुवेतमधील अली अल-सालेम, कॅम्प बुहेरिंग आणि अल जॅबर यांसारख्या तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणच्या ताफ्यात २ हजार किमीपर्यंत पल्ला असलेली क्षेपणास्त्रे आणि घातक ‘शाहेद’ ड्रोन्स असल्याने बहरीन, इराक आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकन लष्करी आस्थापनेही आता निशाण्यावर आहेत. या भीषण युद्धामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





