Thomas and Uber Cup 2024 (Men’s) : भारताचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

Thomas and Uber Cup 2024 : चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चेंगडू येथे आयोजित थॉमस आणि उबेर कप 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय पुरुष आणि महिला बॅडमिंटन संघांना पराभवाचा सामना करावा लागला. यासह या स्पर्धेतील भारताचे अभियान संपुष्टात आले. भारतीय पुरुष संघाला विजेतेपद राखण्यात अपयश आले. उपांत्यपूर्व फेरीत गुरूवारी पुरुष संघाचा चीनविरुद्ध 3-1 आणि महिला संघाचा जपानविरुद्ध 3-0 असा पराभव झाला.
End of our #ThomasCup campaign. Result not in our favour but proud of each every member of the team for putting efforts on and off the court throughout the competition. Proud of you boys!
📸: @badmintonphoto#ThomasUberCupFinals#TeamIndia#Badminton pic.twitter.com/9qn2AiPrVB
— BAI Media (@BAI_Media) May 2, 2024
पहिला सामन्यात बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉयला दुसऱ्या मानांकित चीनच्या ‘शि यू क्यूई’कडून 21-15, 11-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. थॉमस चषकाच्या दुसऱ्या सामन्यात चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना वेई केंग-वांग चांग यांनी 21-15, 11-21, 21-12 ने पराभूत केले आणि यासह भारताची 0-2 अशी पिछाडी झाली.
कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन लक्ष्य सेनच्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या आशा जिवंत राहिल्या आणि स्कोअर 1-2 असा झाला. लक्ष्यने ली शी फेंगचा 13-21, 21-8, 21-14 असा पराभव केला. पुढच्या लढतीत पुरुष दुहेरीच्या सामन्यात ध्रुव कपिला आणि साई प्रतीक या जोडीला जी टिंग-रेन जियांग यू यांच्याकडून 10-21, 10-21 अशा सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि यासह पुरुष संघ थॉमस कपमधून बाहेर पडला.
दरम्यान, त्याआधी थॉमस चषक स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थायलंड आणि इंग्लंडविरुद्ध गटात विजय मिळवला होता, तर गतविजेत्याला इंडोनेशियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह, भारतीय संघ गटातील दुसरा सर्वोत्तम संघ म्हणून थॉमस कप उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला होता.




