India Women Eliminated : टीम इंडियाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, हरमनप्रीतचे अर्धशतक व्यर्थ
India Women Eliminated : भारतीय महिला क्रिकेट संघाचे आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

IND vs AUS Women T20 World Cup 2026 India Eliminated : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रविवारी खेळल्या गेलेल्या ‘करो या मरो’च्या महामुकाबल्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी दारूण पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचे या विश्वचषकातील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले असून, टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरचे वेगवान अर्धशतक व्यर्थ –
या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताची सुरुवात काहीशी संथ झाली होती. जेमिमा रॉड्रिग्ज मोक्याच्या क्षणी ‘रिटायर्ड आउट’ झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने डावाची सूत्रे हाती घेतली. तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. हरमनप्रीतच्या या झुंजार कप्तानी खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद १७० धावांचा आव्हानात्मक डोंगर उभारला होता.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वादळ; गोलंदाजांनी निराशा केली –
Ellyse Perry stepped up to the occasion as Australia knocked India out of the #T20WorldCup to wrap the group stage 👊
Watch the match highlights 📹https://t.co/fKrdSo2Tbi
— ICC (@ICC) June 28, 2026
प्रत्युत्तरात १७१ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली होती. त्यांनी ६८ धावांवर आपले ३ महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. मात्र, त्यानंतर एलिस पेरी आणि ॲश गार्डनर यांनी भारतीय गोलंदाजीतील उणिवांचा पूर्ण फायदा उठवला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानाभोवती धावांचा पाऊस पाडला. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या यशानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दडपण आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने हे मोठे लक्ष्य अवघ्या ४ विकेट्स गमावून सहज गाठले.
ग्रुप ‘ए’ मधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत
Lord’s played host to 2️⃣ blockbuster clashes seeing India’s tournament come to an end and South Africa advance to the #T20WorldCup semi-finals 💥🔝
Make sure you are part of the action 🤩 Get your tickets ➡️ https://t.co/8kyuNOXKdL pic.twitter.com/wetTwNXHCn
— ICC (@ICC) June 28, 2026
या सामन्याच्या निकालानंतर ग्रुप ‘ए’ मधून अंतिम चारमध्ये पोहोचणाऱ्या संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहत ऑस्ट्रेलियाने आणि दुसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. भारताला उपांत्य फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते, परंतु या पराभवामुळे नेट रनरेटचे सर्व समीकरणे कोलमडली. आता भारतीय संघाला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागणार आहे.





