भारत लवकरच ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार, राष्ट्रपती मुर्मू यांची न्यूझीलंडमध्ये मोठी घोषणा

ऑकलंड- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. न्यूझीलंडशी राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रवासी भारतीयांना सुविधा देण्यासाठी भारत लवकरच ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडेल, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले. ऑकलंडमध्ये भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तालय वेलिंग्टन येथे आहे. न्यूझीलंडच्या लोकसंख्येत सहा टक्के भारतीय वंशाचे लोक आहेत.
न्यूझीलंडच्या विकासात भारतीयांचा महत्त्वाचा वाटा –
न्यूझीलंडच्या विकासात भारतीय स्थलांतरितांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. न्यूझीलंडमधील प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचा प्रभाव दिसून येतो. व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आणि आयटीसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांचे यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी कौतुक केले.
द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा –
अनिवासी भारतीयांनी आपल्या परिश्रम आणि त्यागातून न्यूझीलंडच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत योगदान दिले आहे. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो, पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चाही केली.





