‘भारत उभारणार स्वतःचे स्पेस स्टेशन’ – एस. सोमनाथ

बेंगळुरू – नवीन वर्षातील दुसरी मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या तोडीचे भारताचे स्वतंत्र अंतराळ स्थानक अर्थात स्पेस स्टेशन उभारण्याला भारताचे आगामी काळात प्राधान्य राहील. हे अंतराळ स्थानक भारताच्या परवानगीने अन्य देशांनाही वापरता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी सोमनाथ बोलत होते.
चांद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एक दिशा, एक ध्येय दिले आहे. अमृतकाळात आपल्याला काय साध्य करायचे आहे याची तयारी करावी लागेल. चांद्रयान-३ लँडर विक्रमची हॉप चाचणी, प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्रावरून पृथ्वीच्या कक्षेत परत आणणे आणि आता आदित्य मिशनला हॅलो ऑर्बिटमध्ये (लॅग्रेंज-१) ठेवणे हे भविष्यातील तयारीचा एक भाग आहे, याकडे सोमनाथ यांनी लक्ष वेधले.
स्पेस स्टेशनचे डिझाईन संपूर्णपणे भारतीय असेल, असे सांगून सोमनाथ पुढे म्हणाले की, अवकाशात स्थापित केल्यानंतर ते ऑपरेट करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला मंगळावर उतरायचे आहे. हे एक अतिशय आव्हानात्मक मिशन आहे. याशिवाय २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. अशा मोहिमांमध्ये यश मिळाल्याने भविष्यातील गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये आत्मविश्वास वाढतो.
अंतराळ संशोधनातील आपली व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्याला मोहिमांमध्ये नाविन्य आणावे लागेल. नवीन कल्पना आणाव्या लागतील. त्यामुळे तांत्रिक प्रगती सुरूच राहील, असे सांगून सोमनाथ पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान जसजसे प्रगत होते तसतसे खर्चही कमी होतात.
ऑटोमेशन होते आणि बहुतेक सिस्टम स्वयंचलित असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित होते आणि कार्यक्षमता वाढते. चांद्रयान-३ आणि आदित्य मिशनमध्ये बरेच ऑटोमेशन झाले आहे. रिमोट सेन्सिंग आणि कम्युनिकेशन सॅटेलाइटमध्येही या तांत्रिक सुधारणांचा लाभ आम्हाला मिळेल, असेही ते शेवटी म्हणाले.





