रशिया-युक्रेन युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज, भारत मदतीला तयार; पीएम मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा

कझान – ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला पोहोचले आहेत. 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान रशियातील कझान येथे 16 वी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशिया-युक्रेन संघर्ष शांततेत सोडवण्याच्या गरजेवर भर दिला. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर कझान येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेला संघर्ष शांततेने सोडवला पाहिजे, असे स्पष्ट केले.
शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होण्यास भारताचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचे सर्व प्रयत्न मानवतेला प्राधान्य देतात. भविष्यात भारत प्रत्येक शक्य सहकार्यासाठी तयार आहे, असे पीएम मोदी म्हणाले.
तीन महिन्यांतील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा रशिया दौरा आहे. पीएम मोदी म्हणाले, गेल्या तीन महिन्यांतील माझ्या दोन रशियाच्या भेटींमध्ये आमचा घनिष्ट समन्वय आणि सखोल मैत्री दिसून येते. जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या वार्षिक शिखर परिषदेने प्रत्येक क्षेत्रात आमचे सहकार्य अधिक मजबूत केले आहे. गेल्या 15 वर्षांत ब्रिक्सने स्वतःची खास ओळख निर्माण केली असून आता जगातील अनेक देशांना त्यात सामील व्हायचे आहे. उद्या होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदी म्हणाले.
द्विपक्षीय चर्चेदरम्यान पुतिन यांनी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्याचा संदर्भ देत म्हटले, “मला आठवते की आम्ही जुलैमध्ये भेटलो होतो, अनेक मुद्द्यांवर खूप चांगली चर्चा झाली होती. आम्ही अनेक वेळा दूरध्वनीवरही बोललो. मी त्यांचा आभारी आहे. तूम्ही काझानला येण्याचे आमंत्रण स्वीकारले.”
रशियाचे राष्ट्रपती पुढे म्हणाले, “आज आपण ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहोत आणि त्यानंतर रात्रीचे जेवण होणार आहे. ब्रिक्स परिषदेत आपण इतर नेत्यांची भेट घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत. रशिया-भारत संबंधांनी धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप कायम ठेवले आहे आणि ते सक्रियपणे विकसित होत आहेत.”





