भारत-पाकिस्तान पैकी कोणता क्रिकेट संघ सर्वोत्तम? ‘त्या’ सामन्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले…

PM Modi Podcast with Lex Fridman | अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा व्हीडिओ समोर आला आहे. 3 तासांच्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्यांवर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये त्यांना चीनपासून ते भारत-पाकिस्तान संबंधांपर्यंत अनेक मुद्यांवर प्रश्न विचारण्यात आले. पॉडकास्टमध्ये फ्रीडमन यांनी मोदींना भारत-पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाबद्दलही प्रश्न विचारला.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये कोण सर्वोत्तम आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये मोदींना विचारण्यात आला. यावर पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणता संघ चांगला हे सामन्याचे निकालावरून ठरते. त्यांनी नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान संघाच्या सामन्याचाही उल्लेख केला. स्पर्धेचे नाव न घेता मोदी म्हणाले की, अलिकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना झाला, त्या सामन्याचा निकाल सांगतो की कोणता संघ सर्वोत्तम आहे.
फ्रीडमन यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मोदी म्हणाले की, ‘खेळ संपूर्ण जगाला उर्जा देतो. क्रीडावृत्तीची भावना जगाला जोडते, म्हणून मला खेळांची बदनामी होताना पाहायला आवडणार नाही, मी खेळांना मानवी विकासाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग मानतो.’
ते पुढे म्हणाले की, ‘जर आपण कोण चांगले आहे आणि कोण वाईट आहे याबद्दल बोलत असेल तर खेळाच्या तंत्राबद्दल बोलण्यासाठी मी त्यामधील तज्ञ नाही. काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सामना झाला होता. या निकालावरूनच कोणता संघ चांगला हे दिसून येते.’ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकवर दणदणीत विजय मिळवला होता.





