पाकची धडपड सुरूच ! पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा ; भारतविरुद्ध भूमिका घेत OIC मध्ये केली तक्रार

India VS Pakistan । जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मोठे पाऊल उचलले आहे. कारण पाकने आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने जगातील 57 देशांचा गट असणाऱ्या ओआयसी म्हणजेच इस्लामिक सहकार्य संघटनेचा पाठींबा मिळवला असल्याचा दावा केला आहे. नुकतेच पाकिस्तानने दक्षिण आशियातील ताज्या परिस्थितीबद्दल ओआयसीला माहिती दिली होती. त्यावेळी भारताने केलेल्या कृतींना या प्रदेशाच्या शांततेसाठी ‘गंभीर धोका’ म्हणून वर्णन करण्यात आले होते.
अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये झालेल्या ओआयसी राजदूतांच्या बैठकीत पाकिस्तानने दक्षिण आशियाच्या मुद्द्यावर भाष्य केले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी यावेळी एक निवेदन जारी केले त्यात त्यांनी, भारताने घेतलेले निर्णय ‘अत्यंत चिथावणीखोर, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार’ होते असे म्हटले. त्यांनी ओआयसीच्या सदस्य देशांना भारताची भूमिका आणि त्याचे परिणाम विचारात घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
काश्मीर प्रश्नाचे शांततापूर्ण निराकरण करण्याबद्दल चर्चा India VS Pakistan ।
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, ओआयसी राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेसाठी एकता आणि पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे तणाव कमी करण्याचे आणि प्रादेशिक तणावाचे मूळ शोधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेष उल्लेख केला. वृत्तानुसार, राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ओआयसीच्या ठरावांच्या आधारे काश्मीर प्रश्नाचे शांततापूर्ण निराकरण करण्याबद्दल चर्चा केली आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि “कोणत्याही आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर देण्याचा” संकल्प देखील व्यक्त केला. 22 एप्रिल मंगळवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर दोघांमधील ही पहिलीच बैठक होती.
नेत्यांनी सांगितले की, ‘पाकिस्तान एकजूट आहे आणि त्याच्या सशस्त्र दलांसोबत उभा आहे, जे कोणत्याही धोक्याला किंवा आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.’ रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, शरीफ यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-सानी यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.चर्चेदरम्यान, त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या ‘पारदर्शक’ तपासासाठी सहकार्याची मिळण्याची भावना व्यक्त केली आहे.
पाकिस्तानची परिस्थिती बिकट India VS Pakistan ।
पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अंतर्गतरित्या विभाजित आहे. कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षाला हाताळण्याच्या स्थितीत ते नाहीत. असे असूनही, ते सोशल मीडिया आणि काही देशांतर्गत मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोट्या लष्करी तयारीचा प्रचार करत आहे. अलिकडेच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या रेषांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, जो सोशल मीडियावर 2022 मधील जुना फुटेज म्हणून फेटाळण्यात आला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याला जाणीवपूर्वक केलेला प्रचार म्हटले आहे. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानमधील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास हाताळण्याचा हा केवळ एक प्रयत्न आहे.





