IND vs NZ 2nd Test (Day 2) : कोहली-रोहित पुन्हा फ्लॉप, न्यूझीलंडने टीम इंडियाला 156 धावांवरच गुंडाळलं…

IND vs NZ 2nd Test (Day 2) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर (MCA Intl Stadium, Gahunje) खेळला जात आहे. पुण्यात खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा फिरकीपटूंचा संघर्ष कायम राहिला. दुसऱ्याच दिवशी डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरच्या फिरकीला भारतीय फलंदाज बळी पडले आणि पहिल्या डावात अवघ्या 156 धावांत सर्वबाद झाले. अशाप्रकारे किवी संघाने भारतावर 103 धावांची आघाडी घेतली.
पहिल्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला छाप पाडता आली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा गुरुवारीच खाते न उघडता माघारी परतला होता. आज भारताने कालच्या 1 बाद 16 धावांवरून दुसऱ्या दिवशी पुढे खेळण्यास सुरूवात केली. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सहज धावा करत होते, पण शुभमन गिल आऊट होताच भारताची विकेट पडण्याची प्रक्रिया (पडझड) सुरू झाली.
शुक्रवारी भारताला पहिला झटका शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो 30 धावा करून बाद झाला. त्याचवेळी विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि एक धाव काढून पॅव्हेलियन परतला. त्यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वालही 30 धावा करून ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर पायचीत झाला. ऋषभ पंत 18 धावांवर, सर्फराज खान 11 धावांवर, आर अश्विन 04 धावांवर, आकाश दीप 06 धावांवर बाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. मिचेल सँटनरने बुमराहला बाद करताच भारताचा डाव संपुष्टात आला. बुमराह खाते न उघडताच बाद झाला तर वॉशिंग्टन सुंदर 18 धावांवर नाबाद माघारी परतला.
A 103-run first innings lead in Pune. Mitchell Santner leading the way with career-best Test figures of 7-53, alongside Glenn Phillips (2-26) and Tim Southee (1-18). Follow play LIVE in NZ on @skysportnz 📺 or @SENZ_Radio 📻 LIVE scoring https://t.co/VJzmDajMi0 📲 #INDvNZ pic.twitter.com/oubjuUxyBu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 25, 2024
मिचेल सँटनरने भारतीय डाव स्वस्तात गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सँटनरने 19.3 षटकात 53 धावा देताना सात विकेट घेत एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. भारतात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा सँटनर हा न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर भारतातील कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारा सँटनर हा न्यूझीलंडचा दुसरा फिरकी गोलंदाज देखील ठरला आहे. सँटनरव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स याने दोघांना बाद केलं. तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.
दरम्यान, पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला किवी संघ 259 धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक 76 तर बंगळुरू कसोटीचा हिरो रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वॉशिंग्टन सुंदरने किवी संघाच्या 7 फलंदाजांना आपला बळी बनवले. याशिवाय रवी अश्विनने 3 बळी घेतले.





