Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीवरून ‘या’ माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरवर संताप; म्हणाले…
तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवल्याने भारताचे माजी धडाकेबाज सलामीवीर आणि माजी मुख्य निवडकर्ते के. श्रीकांत यांचा पारा चांगलाच चढला आहे.

Vaibhav Sooryavanshi : भारताविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्याच लढतीत यजमान अफगाणिस्तानला ७ गडी राखून धूळ चारत टीम इंडियाने विजयी सलामी दिली. मालिका भारतातच खेळवली जात असली तरी त्याचे यजमानपद अफगाणिस्तानकडे आहे.
भारताने सामना सहज खिशात घातला असला, तरी संघ निवडीवरून एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवल्याने भारताचे माजी धडाकेबाज सलामीवीर आणि माजी मुख्य निवडकर्ते के. श्रीकांत यांचा पारा चांगलाच चढला आहे.
पहिल्या लढतीत भारतीय संघ व्यवस्थापनाने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीवर सलामीची जबाबदारी सोपवली. अभिषेकने नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत संघाला चांगली गती दिली खरी, मात्र संजू सॅमसन पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. अशा वेळी बेंचवर बसलेल्या वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Sooryavanshi) अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.
नुकत्याच झालेल्या भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेत वैभवने १९६.१० च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने १५१ धावा चोपून थेट मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. एवढेच नव्हे तर दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली होती. प्रचंड फॉर्ममध्ये असतानाही त्याला अफगाणिस्तानविरुद्ध बाकावर बसवण्याचा निर्णय क्रिकेट चाहत्यांसह जाणकारांनाही पचनी पडलेला नाही.
संघाच्या या भूमिकेवर के. श्रीकांत यांनी थेट शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. श्रीकांत म्हणाले, “पहिल्या टी-२० मध्ये जेव्हा वैभव सूर्यवंशी प्लेइंग ११ मध्ये दिसला नाही, तेव्हा आम्ही सामना पाहणेच सोडून थेट चित्रपट लावला. माझी पत्नी तर अक्षरशः ओरडली की, गेल्याच मालिकेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ राहिलेल्या खेळाडूला तुम्ही बाहेर कसे बसवू शकता?”
सूर्यवंशीवर (Vaibhav Sooryavanshi) हा घोर अन्याय असल्याचे सांगत श्रीकांत यांनी गंभीर इशारा दिला. ते म्हणाले, “अशा निर्णयांनी खेळाडूच्या मानसिकतेवर प्रचंड आघात होतो. आता जर त्याला पुढच्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याच्या मनात खेळाचा आनंद घेण्याऐवजी ‘या मॅचमध्ये फ्लॉप झालो तर पुढच्या वेळी पुन्हा बाहेर केले जाईल’ हीच भीती सतत घोळत राहील.” भारताने पहिला सामना सहज जिंकला असला, तरी श्रीकांत यांच्या या सडेतोड वक्तव्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेवर आणि निवडीवर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.






