India-US Agreement : भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराविरोधातील (India-US Agreement) आक्रमक पवित्रा युवक कॉंग्रेसने कायम ठेवला आहे. आता त्या संघटनेने कराराच्या निषेधासाठी संसद घेराव आंदोलनाची घोषणा केली आहे. ते आंदोलन सोमवारी होईल. देशभरातील युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात दाखल होतील. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल. त्याविषयीची माहिती शनिवारी दिल्ली युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय लाकडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमेरिकेसमवेतचा व्यापार करार (India-US Agreement) भारतासाठी नुकसानकारक आहे. शेतकरी, वस्त्रोद्योग क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. तसेच, देशाच्या डेटा सुरक्षेशी तडजोड होईल, असा आरोप त्यांनी केला. याआधी युवक कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी कराराच्या निषेधासाठी दिल्लीतील एआय इम्पॅक्ट शिखर परिषदस्थळी शर्टलेस निदर्शने केली. त्यावरून चिब यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांनी त्यांची तुरूंगातून सुटका झाली. त्या नाट्यमय घडामोडींनंतर युवक कॉंग्रेस ही संघटना पुन्हा कराराविरोधात एल्गार करण्यासाठी सज्ज झाली आहे.