Sugar production : देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल नऊ पटीने वाढ
Sugar production : महाराष्ट्रात साखर उत्पादनात नऊ पटीने वाढ; देशातील १८४ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू, साखरेचा पुरेसा साठा असल्याने पुरवठ्याची चिंता नाही – इस्मा

Sugar production : देशात २०२६-२७ च्या साखर हंगामाला वेग आला असून, ५ नोव्हेंबरपर्यंत १२.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ३.२० लाख टन उत्पादन झाले होते. यंदा ऊस गाळप लवकर सुरू झाल्याने उत्पादनात जवळपास चार पटीने वाढ झाली आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) शुक्रवारी ही माहिती दिली.
देशभरात आतापर्यंत १८४ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात १५४ कारखाने सुरू होते. म्हणजेच यंदा ३० कारखाने अधिक सुरू झाले आहेत.
महाराष्ट्रात उत्पादनात नऊ पटीने वाढ –
साखर उत्पादनात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. राज्यातील १३६ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले असून, ५ नोव्हेंबरपर्यंत १०.७८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०१ कारखान्यांमधून केवळ १.२३ लाख टन उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा राज्यातील उत्पादनात जवळपास नऊ पटीने वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेशातही गाळपाला सुरुवात –
उत्तर प्रदेशातील पश्चिम आणि मध्य भागातील १९ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू झाले आहे. या कारखान्यांतून आतापर्यंत २० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश उर्वरित कारखाने पुढील काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. तर मध्य उत्तर प्रदेशातील कारखान्यांमध्ये दिवाळीनंतर गाळप सुरू होईल, अशी माहिती इस्माने दिली.
साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध –
देशात साखरेची कमतरता भासणार नसल्याचे इस्माने स्पष्ट केले आहे. मागील हंगामातील सुमारे ३६ लाख टन साखरेचा साठा शिल्लक आहे. त्यातच नव्या हंगामातील उत्पादनही वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर उपलब्ध राहील, असे इस्माचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी सांगितले. देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवणे हे साखर उद्योगाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





