भारताने इराणसोबत चाबहार बंदरावर दीर्घकालीन द्विपक्षीय करारावर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली – केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल इराणमधील चाबहार इथे आज शाहीद बेहेश्ती बंदर अंतिम केंद्र, चाबहारच्या विकासासाठी दीर्घकालीन मुख्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभाला उपस्थित राहिले. इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड आणि इराणच्या पोर्टस् अँड मेरिटाईम ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.
सोनोवाल यांनी इराणचे रस्ते आणि नागरी विकास मंत्री एच.ई. मेहरदाद बाझ्रपाश यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या देशांतील नेतृत्वांच्या संपर्क उपक्रमांद्वारे द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याच्या आणि चाबहार बंदराला प्रादेशिक संपर्काचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
या करारामुळे चाबहार येथे भारताच्या दीर्घकालीन सहभागाची पायाभरणी झाली आहे. या करारावर स्वाक्षरी चाबहार बंदराच्या व्यवहार्यता आणि दृश्यमानता अनेकपट वाढेल. चाबहार हे केवळ भारताच्या सर्वात जवळचे इराणचे बंदर नाही तर ते सागरी दृष्टिकोनातूनही एक उत्कृष्ट बंदर आहे, असे सोनोवाल म्हणाले.
दीर्घकालीन कंरारामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होतील तसेच अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापाराचे द्वार म्हणून चाबहारचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. चाबहार बंदर प्रकल्पाची उभारणी हा भारत व इराणसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, असेही सोनोवाल म्हणाले.
या दीर्घकालीन करारामुळे भारत आणि इराण दरम्यानच्या द्विपक्षीय भागीदारीचा नवीन अध्याय लिहीला जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी म्हटले आहे.
प्रादेशिक कनेक्टिव्हीटीला मोठे बळ…
या करारामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि भारताच्या अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि युरेशिया यांच्याशी जोडले जाण्यास चालना मिळेल. ओमानच्या आखातात इराणच्या किनाऱ्यावर वसलेले चाबहार बंदर दीर्घ काळासाठी भारताला भाडेतत्त्वावर घेता येईल. ते दक्षिण आशिया आणि मध्य आशिया दरम्यान इराण मार्गे एक नवीन व्यापार मार्ग उघडेल, कराची तसेच पाकिस्तानमधील ग्वादर बंदरांना मागे टाकून. संवेदनशील आणि व्यस्त पर्शियन गल्फ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पर्यायी पारगमन मार्ग शोधण्यासाठी या कराराने व्यावसायिक समुदायांसाठी आर्थिक संधींचा एक नवीन मार्ग देखील उघडला आहे.





