रशियाच्या आक्रमणाविषयी भारताने ठोस भूमिका घ्यावी; कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांची मागणी

नवी दिल्ली – रशियाने युक्रेनमध्ये जे आक्रमण केले आहे त्या संबंधात भारत सरकारने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केले आहे. तिवारी म्हणाले, “भारताने या संबंधात निःसंदिग्ध भूमिका घेणे गरजेचे आहे. रशिया हा जरी भारताचा मित्र असला तरी त्यांनी युक्रेनमध्ये, जे केले ते चुकीचेच आहे असे भारताने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगणे गरजेचे आहे.
युद्धाची कारणे असू शकतात परंतु युद्धाचे कोणतेही औचित्य असू शकत नाही आणि युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या संदर्भात, युद्धाचे कोणतेही कारण नाही किंवा युद्धाचे कोणतेही औचित्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे. रशियाची ही आक्रमकता थांबवण्यासाठी आणि रशियाने युक्रेनच्या भूभागावर केलेला बेकायदेशीर कब्जा किंवा बेकायदेशीर आक्रमण तत्काळ थांबवण्यासाठी जगाने एकत्र आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या संबंधात भारत सरकारने खूप आधीच कारवाई करायला हवी होती; परंतु भारत सरकारने या कारवाईत खूप ढिलाई दाखवली आहे. त्याच्या जबाबदारीतून ते पळ काढू शकत नाहीत असेही तिवारी यांनी यावेळी नमूद केले. रशिया भारताचा मित्र आहे या मैत्रीची आम्ही कदर करतो पण त्यांनी ज्या पद्धतीने युक्रेनवर बेकायदेशीर आणि अनैतिक अतिक्रमण केले आहे त्याचा आम्ही निषेधच करतो अशी भूमिकाही त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने मांडली आहे.





