हार्दिकच्या नेतृत्वात तिसरी मालिका जिंकण्यास टीम इंडिया सज्ज; संघात ‘हे’ बदल होण्याची दाट शक्यता

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर टी-२० सामना खेळला जाणार आहे. या ३ सामन्यांच्या मालिकेतील आजचा दुसरा सामना जिंकून भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात तिसऱ्या टी-२० मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. टीम इंडियाने आजचा सामना जिंकल्यास दोन किंवा अधिक सामन्यांच्या मालिकेतील श्रीलंकेविरुद्धचा हा भारताचा पाचवा मालिका विजय ठरेल.
सप्टेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार; आशिया चषकबद्दल सविस्तर माहिती…
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० फॉरमॅटमधील ही सहावी मालिका खेळवली जात आहे. यापैकी भारताने चार मालिकांमध्ये बाजी मारली आहे. तर एक मालिका अनिर्णित राहिली आहे. त्याचबरोबर दोन्ही संघामध्ये एक-एक असे तीन टी-२० सामने झाले असून यामध्ये भारतानेच बाजी मारलेली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पाचव्या मालिका विजयासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
हार्दिकचे प्रभावी नेतृत्व
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन टी-२० मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यात यश आल्यास हार्दिकच्या नेतृत्वात सलग तिसरा मालिका विजय असेल. याआधी पंड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. तर गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती. त्यामुळे आता हार्दिक पंड्याचे नेतृत्व प्रभावी दिसत आहे.
#TeamIndia have arrived at the stadium for the second T20I against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/8if6o0uBN7
— BCCI (@BCCI) January 5, 2023
वरच्या फळीतील फलंदाजांकडून सुधारणा आवश्यक
मुंबईतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आवश्यकता आहे. वरच्या फळीतील फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून द्यायचा प्रयत्न करावा, असे हार्दिक पंड्याने पहिल्या सामन्यानंतर म्हटले आहे. या सामन्यात शुभमन गिल (७), सूर्यकुमार यादव (७) आणि संजू सॅमसन केवळ (५) धावा करून बाद झाले होते. त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नव्हती. दीपक हुडाने शेवटी दमदार फालंदाजी केल्याने भारताला १६२ धावा करता आल्या होत्या.
सॅमसन आऊट जितेश शर्मा इन
संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी पंजाब किंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जितेश शर्मा यालाच संधी दिली जाईल की राहुल त्रिपाठी किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवले जाईल हे पाहावे लागेल. राहुल त्रिपाठीला संधी मिळाल्यास त्याचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण असणार आहे.
चहलकडे लक्ष असणार
भारताचा फिरकीपटू युझवेन्द्र चहलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्यास संधी मिळाली नाही. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने २ षटकांत २६ धावा खर्च केल्या. विरोधी संघाचे फलंदाज चहलच्या गोलंदाजीला कोणत्याही अडचणीशिवाय खेळताना दिसले. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्याने त्याला तिसरे षटक टाकण्यास न देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अर्शदिप सिंग सामन्यासाठी उपलब्ध असल्यास त्याला हर्षल पटेलच्या जागी संघात घेतले जाऊ शकते.
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन(यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी/वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग/हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी.
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो/कुशाल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ अस्लंका, धनंजय डिसिल्व्हा, वानिंदू हसरंगा, महेश तिक्ष्णा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, कसुन रजिता.





