#ENGvIND 2nd Test Day 2 : जडेजाच्या खेळीने भारताची त्रिशतकी मजल

लंडन -लोकेश राहुलच्या दमदार खेळीनंतर तळात ऋषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने यजमान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा उभारल्या. तळातील फलंदाज भारतीय संघासाठी सातत्याने धावा काढत असताना प्रमुख फलंदाजांचे अपयश नजरेत खटकत आहे.
कालच्या 3 बाद 276 धावांवरून शुक्रवारी खेळ सुरू झाल्यावर अजिंक्य रहाणे पहिल्याच षटकांत तंबूत परतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर रहाणेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याने साफ निराशा केली. गुरुवारी नाबाद 127 धावांवर खेळत असलेल्या राहुलला केवळ दोन धावांची भर घालता आली. तो 129 धावांवर परतल्यानंतर भारताच्या डावाला पंत व जडेजा यांनी सावरले. या जोडीने 6 व्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली व संघाला त्रिशतकी धावांपर्यंत मजल मारून दिली.
जडेजा पहिल्या कसोटीतही दमदार अर्धशतकी खेळी केली होती. आता पहिल्या डावात त्याने 40 धावांची झुंझार खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. पंतने त्याला योग्य साथ देताना 37 धावा केल्या. पंत बाद झाल्यावरही जडेजाने अत्यंत जबाबदारीने तळातील फलंदाजांना हाताशी घेत संघाला साडेतीनशेपेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठून दिला.
इंग्लंडकडून सर्वात जास्त यशस्वी गोलंदाज ठरला जेम्स अँडरसन. त्याने या डावात पाच गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना ओली रॉबिन्सन व मार्क वुड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या कसोटीत संधी मिळालेल्या फिरकी गोलंदाज मोईन अली याला एक बळी मिळवता आला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 126.1 षटकांत सर्वबाद 364 धावा. (लोकेश राहुल 129, रोहित शर्मा 83, विराट कोहली 42, रवींद्र जडेजा 40, ऋषभ पंत 37, जेम्स अँडरसन 5-62, ओली रॉबिन्सन 2-73, मार्क वुड 2-91, मोईन अली 1-53).





