Nijjar murder Case: पीएम मोदींचे नाव घेत केलेला कॅनडातील माध्यमाचा ‘तो’ दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली, – भारतीय पंतप्रधानांना दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा कट रचल्याची माहिती होती असा दावा कॅनडाच्या एका माध्यमाने एका कथित अधिकाऱ्याचा हवाला देत केला होता. त्या माध्यमाच्या वृत्ताला भारताने बदनामीकारक मोहीम म्हणून घोषित करत याचा तीव्र निषेध केला आहे.
अशा हास्यास्पद विधानांना तेवढ्याच अपमानास्पद पध्दतीने फेटाळले पाहिजे जेवढी त्यांची लायकी आहे अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या प्रकारावर टीका केली आहे. अशा बदनामीकारक मोहिमेमुळे आमच्या आधीच ताणलेल्या संबंधांची आणखी हानी होऊ शकते असेही जैस्वाल यांनी म्हटले आहे. ते कॅनडातील वृत्तपत्र द ग्लोब अँड मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
या वृत्तपत्राने आपल्या बातमीत राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीचा हवाला दिला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री यांनाही या कटाची (निज्जरच्या हत्येच्या कटाची ) माहिती होती, असा दावा करण्यात आला आहे.
कॅनडाने भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर काही मुत्सद्दींना हत्येच्या आरोपात जोडल्यानंतर भारत-कॅनडा संबंध गेल्या महिन्यात ताणले गेले आणि या प्रकरणात कॅनडाने केलेले सर्व आरोप भारताने ठामपणे नाकारले आणि नंतर उच्चायुक्तांना परत बोलावण्यात आले. कॅनडाच्या आरोपांनंतर, भारताने कॅनडाचे प्रभारी स्टीवर्ट व्हीलर आणि इतर पाच राजनयिकांची हकालपट्टी केली.





