‘स्टार्टअप’मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर

India ranks third in startups – 110 हुन अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले.
देशभरातल्या स्टार्टअप पैकी 43 टक्के स्टार्टअप महिलांनी सुरु केले असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली. जगभरात भू -राजकीय ताणतणाव असूनही भारताची वाढती निर्यात लवकरच 800 बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याचा टप्पा गाठेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान 2024 या वर्षात जगभरात सर्वाधिक भांडवली निधी आयपीओद्वारे एनएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला. आशियातल्या सर्वाधिक आयपीओ- प्राथमिक समभाग विक्रींची नोंदही या शेअर बाजारात झाल्याचं एनएसईने पत्रकात म्हटले आहे.
गेल्यावर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी 19.5 अब्ज डॉलरचा निधी गोळा केला.
अमेरिकेच्या नॅसडॅकमधून 16 अब्ज डॉलर आणि न्यूयॉर्क शेअर बाजारातून सुमारे 16 अब्ज डॉलरचा निधी या कालावधीत कंपन्यांनी गोळा केला. 2024 या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजारात एकूम 268 आयपीओची नोंद झाली. त्यात 90 मोठ्या कंपन्यांचे आणि 178 लघू आणि मध्यम कंपन्यांचे होते. चीनच्या शांघाय शेअर बाजारात गेल्यावर्षी 101 तर जपानच्या शेअर बाजारात 93 आयपीओ आले होते.





