India-Pakistan : भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाली; सिंधू करार स्थगितच राहणार का? वाचा सविस्तर….

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी करण्याचे निश्चित झाले असले, तरी भारताने स्थगित केलेला सिंधू जल वाटप करार हा स्थगितच राहणार आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. पण हा करार स्थगितच राहणार असल्याचे स्पष्टिकरण आज सराकरच्यावतीने देण्यात आले.
भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांकडून सीमेपलिकडून एकमेकांवर गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्याबाबत सामंजस्य करार केल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले, २३ एप्रिल रोजी पाकिस्तानविरुद्ध जाहीर केलेले भारताचे उपाय प्रभावी राहतील.
दहशतवादाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा निर्धार दृढ राहील, असे सूत्रांनी सांगितले. या करारामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे जागतिक बँकेच्यावतीने कालच स्पष्ट केले आहे.
जागतिक बँकेच्या मध्यस्थीनेच हा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला होता. भारताने करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांचे पाणी देखील रोखले आहे.





