Reserve Bank of India : भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांचा आकार वाढण्याची गरज – एम राजेश्वर राव

मुंबई – भारताने 2047 पर्यंत विकसित होण्याचे ध्येय बाळगले आहे. अशा परिस्थितीत भारतातील नागरिकांना आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज लागणार आहे. यासाठी भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांचा आकार वाढण्याची आवश्यकता आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांनी व्यक्त केले.
दक्षिण गोलार्धातील देशांच्या रिझर्व्ह बँकांच्या गव्हर्नरच्या परिषदेत बोलताना राजेश्वरराव यांनी सांगितले की, भारताला विकसित होण्यासाठी इतर विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. भारतातील बँकिंग आणि वित्तीय संस्थांनी गेल्या वीस वर्षात देशात आणि परदेशात अनेक अडचणी असताना उत्तम कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर भारतातील बँकांचे आरोग्य उत्तम आहे. यामुळे भांडवल सुलभता निर्माण होऊन विकासदराला चालना मिळत आहे. मात्र आता भारतातील कंपन्यांचा व्याप वाढणार आहे. देशाबरोबरच परदेशात भारतातील कंपन्या काम करीत आहेत. अशा परिस्थितीत या कंपन्यांना भांडवल लागणार आहे.
यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी धाडसी उपाय योजना हाती घेऊन स्वत:ला बळकट करण्याची गरज आहे. यामध्ये अनेक जोखीमा आहेत. मात्र या जोखीमा स्वीकारल्याशिवाय आपण मोठे होऊ शकणार नाहीत. भारतातील वित्तीय संस्थांनी भांडवल उपलब्ध करण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्गाचा अवलंब करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांना नव्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या 75 वर्षाच्या कार्यकाळात भारतातील बँकींग क्षेत्राचा विस्तार करण्याबरोबरच या बँकांवर उत्तम पद्धतीने नियंत्रण ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.





