Lords Balcony Celebration : लॉर्ड्सच्या बाल्कनीत पुन्हा एकदा फडकला शर्ट! सौरव गांगुलींच्या २००२ च्या सेलिब्रेशनची २४ वर्षांनंतर पुनरावृत्ती
Lords Balcony Celebration : तब्बल २४ वर्षांनंतर लॉर्ड्सच्या याच मैदानावर आणि त्याच बाल्कनीत पुन्हा एकदा तोच ऐतिहासिक क्षण जिवंत झाला.

Lords Recreates Sourav Ganguly 2002 Balcony Shirt Wave Celebration : लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरील ती बाल्कनी पाहिली की प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला २००२ मधील नेटवेस्ट ट्रॉफीच्या विजयाची आणि सौरव गांगुलींच्या (Sourav Ganguly) शर्ट हवेत फिरवण्याच्या त्या अविस्मरणीय जल्लोषाची आठवण येते. तब्बल २४ वर्षांनंतर लॉर्ड्सच्या याच मैदानावर आणि त्याच बाल्कनीत पुन्हा एकदा तोच ऐतिहासिक क्षण जिवंत झाला.
इंडिया मिक्स्ड डिसेबिलिटी क्रिकेट संघाने (India Mixed Disability Cricket Team) इंग्लंडचा ११८ धावांनी धुव्वा उडवला आणि विजयानंतर थेट बाल्कनीत जाऊन ब्लेझर व शर्ट हवेत उडवत गांगुली स्टाईलमध्ये विजयाचा जल्लोष साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सध्या जगभरात प्रचंड व्हायरल होत आहे.
गावरे अन् कर्णधार माग्रेचे वादळ; उभारला २०६ धावांचा डोंगर –
ICONIC CELEBRATION AT LORD’S BALCONY 😍
– Indian mixed disability team defeated England at Lord’s & playing celebrating by waving their T-shirts. [Abhishek Tripathi] pic.twitter.com/On6F9ycCjP
— Johns. (@CricCrazyJohns) August 20, 2026
लॉर्ड्सवरील या टी-२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २०६ धावांचा विशाल डोंगर उभा केला. सलामीवीर साई आकाशने ४८ धावांची पायाभरणी केली, तर अर्जुन गावरेने ४४ चेंडूंत ६८ धावांची शानदार खेळी साकारली. यानंतर मैदानावर उतरलेल्या कर्णधार मेजर माग्रे यांनी अवघ्या १९ चेंडूंत नाबाद ६३ धावांची वादळी आतषबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली.
हिलाल अन् जयेशची फिरकी; इंग्लंड ८८ धावांत गारद –
When India wins at Lord’s, the celebrations hit different.
A moment of pure cricketing joy on the Lord’s Balcony — coats off, spirits high, and the Tricolour flying with pride.
118 runs. One unforgettable celebration.@imRaviKChauhan@official_idca pic.twitter.com/o6IuoRJto8
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) August 19, 2026
२०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरला. हिलाल अहमद वानीने २१ धावांत ४ विकेट्स, तर जयेश परमारने अवघ्या १४ धावांत ३ गडी बाद करत इंग्लंडचा डाव १३.४ षटकांत केवळ ८८ धावांवर गुंडाळला. इंग्लंडकडून जॉनी गेलने सर्वाधिक १९ धावा केल्या. यासह भारताने ११८ धावांच्या मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
मालिका ४-३ ने गमावली, तरीही लॉर्ड्सवर कोरले नाव –
सात सामन्यांच्या या मालिकेत सुरुवातीचे सामने जिंकून इंग्लंडने ४-३ अशी मालिका खिशात घातली असली, तरी लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यातील हा विजय भारतासाठी सुवर्णक्षण ठरला. २००२ मध्ये ज्याप्रमाणे मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगच्या जोरावर गांगुलींच्या संघाने ३२६ धावांचे लक्ष्य गाठून लॉर्ड्सची बाल्कनी गाजवली होती, अगदी तसाच पराक्रम या जिद्दी दिव्यांग संघाने गाजवत भारतीय क्रिकेटचा तिरंगा अभिमानाने फडकवला.





