India LPG Crisis: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आशियाई देशांना गॅस आणि तेलाच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. भारतही एलपीजीच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘पायक्सिस पायनियर’ नावाचे एक जहाज एलपीजी गॅस घेऊन भारतात दाखल झाले. एका इंग्रजी वर्तमानपत्रामधील वृत्तानुसार, पुढील आठवड्यात नवीन मंगळूरू बंदरात एलपीजीचा एक मोठा साठा येण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, एकूण अंदाजे ७२,७०० टन एलपीजी येण्याची अपेक्षा असून, त्याची वाहतूक आधीच सुरू झाली आहे. रविवारी दाखल झालेला पहिला टँकर ‘पायक्सिस पायनियर’ हा सिंगापूरचा ध्वज असलेला टँकर असून, त्याचे एकूण वजन ४७,२३६ टन आहे. हे जहाज १४ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सच्या बंदरातून निघाले असून, ते ‘एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड’साठी एलपीजी उतरवेल. त्यानंतर ते सोमवारी सकाळी रवाना होईल. India LPG Crisis: जगाच्या विविध भागांतून गॅस येणार India LPG Crisis: यानंतर, अपोलो ओशन नावाचा एक टँकर देखील २५ मार्च रोजी बंदरावर दाखल होईल. तो २६,६८७ टन एलपीजी घेऊन येईल. हा गॅस इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी उतरवण्यात येईल. या जहाजावर व्हिएतनामचा ध्वज असून ते गुजरातमधील वडीनार बंदरातून येईल. शिवालिक नावाचा दुसरा टँकर मूळतः १८ मार्च रोजी २६,००० टन एलपीजी घेऊन मंगळुरूला येणार होता, परंतु त्याने वडीनार बंदरावर आपला माल अपोलो ओशन जहाजाकडे सुपूर्द केला. अमेरिकेतून टँकर येणार India LPG Crisis: याशिवाय, अमेरिकेतून अंदाजे ३०,००० टन एलपीजी घेऊन आणखी एक टँकर २९ मार्च रोजी येथे दाखल होईल. हा गॅस हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी असेल. एचपीसीएलचा मंगळुरूमधील एलपीजी प्लांट पाईपलाईनद्वारे स्थानिक बॉटलिंग प्लांट आणि बंगळूरूसह इतर ठिकाणी या गॅसचा पुरवठा करतो. त्यामुळे, नवीन मंगळुरू बंदरात एलपीजीचा मोठा साठा दाखल झाल्याने येत्या काही दिवसांत गॅस पुरवठा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.