India – Israel : भारत-इस्रायल दरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार

नवी दिल्ली : भारत सरकार आणि इस्रायल सरकार यांच्या दरम्यान सोमवारी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि इस्रायलचे अर्थमंत्री बेझलेल स्मोत्रिच यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इस्रायल सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले इस्रायली शिष्टमंडळ आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बीआयएवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
हा करार म्हणजे दोन्ही देशांच्या संबंधांमधील ऐतिहासिक टप्पा आहे. या करारामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, गुंतवणूकदारांना अधिक खात्री आणि संरक्षण मिळेल, किमान मानक हाताळणी सुनिश्चित होऊन तसेच लवादाद्वारे स्वतंत्र विवाद निराकरण यंत्रणा निर्माण होऊन व्यापार आणि परस्पर गुंतवणुकीची सुलभ वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
या करारात जप्तीपासून गुंतवणुकीचे संरक्षण, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि सुरळीत हस्तांतरण आणि नुकसान भरपाई निश्चित करणे यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. त्याच वेळी गुंतवणूकदारांच्या संरक्षणाचे राज्याच्या नियामक अधिकारांशी काळजीपूर्वक संतुलन साधण्यासाठी तसेच सार्वभौम प्रशासनासाठी पुरेशी धोरणात्मक जागा राखण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी आणि अधिक मजबूत आणि लवचिक गुंतवणूक वातावरण निर्माण करण्यासाठीची सामायिक वचनबद्धता दिसून येते.
या करारामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या असलेली एकूण ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या द्विपक्षीय गुंतवणुकीत वाढ होण्याची अपेक्षा आहे, यामुळे दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि अर्थव्यवस्थांनाही फायदा होऊ शकेल. या कराराचा फायदा घेण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी दोन्ही बाजूंनी अधिकाधिक व्यावसायिक संवाद साधावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.





