मॉरिशसच्या विकासात हातभाराचा भारताला अभिमान; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

पोर्ट ल्युइस (मॉरिशस) : मॉरिशला भारताकडून सातत्यपूर्ण आणि नियमित मदत दिली जाईल, याचा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुनरुच्चार केला आहे. मॉरिशसच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात भागीदार होण्याचा भारताला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जयशंकर दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून भारताच्या पुढाकारातून मॉरिशसमध्ये करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि सामंजस्य करारांचे आदान-प्रदान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण जुगनाथ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मॉरिशसला दिलेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे.
मॉरिशस आणि भारतादरम्यान सखोल द्विपक्षीय संबंध आहेत. मॉरिशसबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यावर भारत सरकारचा भर आहे. मॉरिशसच्या विकासात सहभागी होण्याची संधी मिळणे हा भारतासाठी बहुमान आहे, असेही जयशंकर म्हणाले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण जुगनाथ यांच्याबरोबर विकास भागीदारी, संरक्षण आणि सागरी सहकार्य, आर्थिक आणि व्यापारी संबंध तसेच दोन्ही देशांमधील नागरिकांमधील थेट संपर्काच्या मुद्यावर द्विपक्षीय चर्चा झाल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.
शेजारी प्रथम हे भारताचे धोरण, व्हिजन सागर आणि आफ्रिका फॉरवर्ड पुढाकाराच्या धोरणानुसार तसेच ग्लोबल साऊथसाठीच्या भारताच्या वचनबद्धतेतून मॉरिशस भारतासाठी महत्वाचा देश आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण जुगनाथ आणि डॉ. एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत १२ उच्च प्रभावशाली समुदाय परिणाम प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. अशा एकूण ९६ प्रकल्पांमधील ३७ प्रकल्प कार्यान्वित झाले असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.
अंतराळ सहकार्य, संस्कृत अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार
जयशंकर यांच्या उपस्थितीत अंतराळ सहकार्य, राष्ट्रीय अभ्यासक्रम संशोधन संस्थेचा विकास, संस्कृत आणि भारतीय तत्त्वज्ञानासाठी आयसीसीआर अध्यासनाचे नूतनीकरण आणि भारतीय इमिग्रेशन आर्काइव्हजचे डिजिटायझेशन यासाठी करारांची देवाणघेवाण झाली. डॉ जयशंकर यांनी संयुक्त हायड्रोग्राफिक सेवेद्वारे उत्पादित मॉरिशियन नॉटिकल चार्टच्या विक्रीसाठी रॉयल्टी पेमेंट चेक सुपूर्द केला. तसेच ७ व्या पिढीतील मॉरिशियन नागरिकांना ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया कार्डचे वाटप केले.





