इंडिया इज ऑन मून..! ‘चांद्रयान-3’ यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींचं ऐतिहासिक भाषण…

नवी दिल्ली – चंद्रावर उतरुन भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. अखंड भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या. दक्षिण अफ्रिकेतून दृश्यप्रणालीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर भारतीयांशी संवाद साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांदेखल असा इतिहास बनत असताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशी ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होऊन जाते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हे क्षण अभूतपूर्व आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोषाचा आहे. हा क्षण अडचणींच्या महासागराला पार करण्याचा आहे. हा क्षण 140 कोटी लोकांच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण भारतात नवी ऊर्जा, नवा विश्वास, नव्या चेतनेचा आहे. हा क्षण भारताच्या उदयमान भाग्याच्या आवाहनाचा आहे.
अमृत वर्षाचा पहिल्या टप्प्यात यशाचा वर्षाव झाला आहे. आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि तो संकल्प चंद्रावर साकार केला. वैज्ञानिक सहकाऱ्यांनीही सांगितले की “इंडिया इज ऑन मून’. आज आपण आंतरिक्षमध्ये नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनलो आहोत. मी या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत आहे.
परंतु, प्रत्येक देशवासियांप्रमाणे माझं मन चंद्रयान अभियानात लागले होते. नवा इतिहास बनताच प्रत्येक भारतीय उत्साहात बुडाला. मी “चांद्रयान-3’साठी इस्रो आणि देशाच्या सर्व वैज्ञानिकांचे खूप-खूप अभिनंदन करतो. ज्यांनी या क्षणासाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेतले. उत्साह, मन, आनंद या भावुकताने भरलेल्या अद्भूत क्षणासाठी मी देशवासियांनाही कोटी-कोटी शुभेच्छा देतो. असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.





