India-Pakistan : “बलुचिस्तानमधील हिंसाचारामागे भारताचा हात…”; भारताने पाकिस्तानचा दावा फेटाळला
बलुचिस्तानमधील हिंसाचाराबाबत पाकिस्तानने भारतावर केलेला आरोप भारताने सपशेल फेटाळून लावला आहे.

India-Pakistan – बलुचिस्तानमधील हिंसाचाराबाबत पाकिस्तानने भारतावर केलेला आरोप भारताने सपशेल फेटाळून लावला आहे. बलुचिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या कटामागे भारताचा हात होता, असा आरोप पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी केला होता. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानने भारतावर असे आरोप करणे काही नवीन नाही. बलुचिस्तानमधील हल्ल्यांमागे भारत असल्याचा आरोप पुर्णपणे बिनबुडाचा असून पाकिस्तानच्या अंतर्गत विषयांपासून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. भारतावर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या नागरिकांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये दडपशाही, क्रौर्य आणि मानवी हक्कांच्या पायमल्लीची परिसीमा गाठली आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे, असेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.
बलुचिस्तानमधील १४ वेगवेगळ्या शहरांवर एकाच वेळी हल्ले करण्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. ऑपरेशन हेरॉफ २.० अंतर्गत हे हल्ले करण्यात आले होते. बलुच बंडखोरांनी पोलीस ठाणी, सुरक्षाविषयक संस्थांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे ८४ सैनिक मारले गेले.
१८ सैनिक पकडले गेले. ३० सरकारी इमारती उद्ध्वस्त केल्या गेल्या किंवा त्यांच्यावर नियंत्रण मिळवले गेले. तर पाक सैन्याच्या २३ वाहनांना आग लावण्यात आली. मध्यवर्ती लष्करी मुख्यालयासारख्या काही महत्वाच्या इमारतींचा ताबा बलुच बंडखोरांनी घेतला असल्याचे बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे.





