भारत हा जागतिक आणि आर्थिक महासत्ता; रशियाने केले कौतुक

नवी दिल्ली : रशियाने जागतिक महासत्ता म्हणून भारताच्या प्रतिष्ठेचे कौतुक केले आहे आणि वैविध्यपूर्ण परराष्ट्र धोरणासह भारताला एक आघाडीची आर्थिक शक्ती म्हटले आहे. रशिया आणि भारताचे परस्पर हितसंबंध आहेत आणि त्यांनी सातत्याने सहकार्य करण्याचे मार्ग शोधले आहेत, असे आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना भारतातील रशियाचे प्रभारी रोमन बाबुश्किन म्हणाले.
दोन्ही देशांमधील संबंध विस्तारत आहेत आणि अखंडित आहेत, असेही ते म्हणाले. रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्याने युक्रेनमधील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या दोन फोन कॉल्सचाही उल्लेख केला. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या मॉस्को भेटीसह इतर अनेक कार्यक्रम या वर्षाच्या अखेरीस अध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीसाठी मार्ग तयार करत आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.
रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेकडून भारतावर आणला जात असलेला दबाव अमान्य आहे. बाह्य दबाव असूनही भारत-रशिया ऊर्जा सहकार्य सुरूच राहील, याची आम्हाला खात्री आहे. भारतासाठी ही एक आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि भारतासोबतच्या आमच्या संबंधांवर आमचा विश्वास आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जे लोक रशियावर नवीन निर्बंध लादत आहेत, त्यांच्यावरच या निर्बंधांचा परिणाम होईल. सध्या सुरू असलेल्या जागतिक अशांततेच्या काळात स्थिरीकरण शक्ती म्हणून ब्रिक्सची भूमिका वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.





