भारताने उचलले मोठे पाऊल, चीनमधून येणाऱ्या ‘या’ 4 वस्तूंवर लावले अँटी-डंपिंग शुल्क

Anti-Dumping Duty | भारताने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर अँटी-डंपिंग शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधून येणाऱ्या स्वस्त आयातीपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमधून येणाऱ्या एकूण 4 वस्तूंवर अँटी-डंपिंग शुल्क लागू करण्यात आले असून, या वस्तूंमध्ये व्हॅक्यूम फ्लास्क आणि ॲल्युमिनियम फॉइलचा समावेश आहे.
अँटी-डंपिंग शुल्क हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर लावले जाते. आयात करण्यात आलेल्या वस्तूंचा दर हा देशांतर्गत वस्तूंच्या किमान मूल्यापेक्षा कमी असतो. यामुळे स्थानिक उद्योगांना तोटा सहन करावा लागतो. स्थानिक उद्योग आणि व्यावसायिकांना संरक्षण देण्यासाठी आणि अनियंत्रित आयात कमी करण्यासाठी सरकारकडून हे शुल्क लावले जाते.
चीनमधून भारतात सामान्य किंमतीपेक्षा कमी दरात वस्तूंची निर्यात केली जात असल्यामुळे सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या उत्पादनावर अँटी-डपिंग शुल्क लावण्यात आले आहे, त्यामध्ये सॉफ्ट फेराइट कोर, व्हॅक्यूम इन्सुलेटेड फ्लास्क, ॲल्युमिनियम फॉइल आणि ट्रायक्लोरो आइसोसायन्यूरिक ॲसिडचा समावेश आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (Central Board of Indirect Taxes and Customs) याबाबत वेगवेगळ्या अधिसूचना जारी केल्या आहेत. यानुसार, सॉफ्ट फेराइट कोर, व्हॅक्यूम इन्सुलेटेड फ्लास्क आणि ट्रायक्लोरो आइसोसायन्यूरिक ॲसिडच्या आयातीवर पाच वर्षांसाठी अँटी-डपिंग शुल्क लागू केले जाईल. यापैकी ॲल्युमिनियम फॉइलवर सहा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात 873 डॉलर प्रति टनपर्यंत अँटी-डंपिंग शुल्क लावण्यात आले आहे.





