Kangana Ranaut : ‘आता भारताला हिंदु राष्ट्र बनवणार’; कंगना राणावतच विधान चर्चेत

India | Hindu Rashtra | Kangana Ranaut : भारताला सन २०१४ मध्येच स्वातंत्र्य मिळाल्याचा वादग्रस्त दावा अभिनेत्री व मंडी मतदार संघातील भाजप उमेदवार कंगना राणावत हिने पुन्हा केला आहे. भारत हा मला हिंदु राष्ट्र झालेला पहायचे आहे असेही तिने म्हटले आहे.
येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना म्हणाली, आमच्या लोकांनी मुघलांच्या आणि त्यानंतर इंग्रजांच्या हाताखाली शतकानुशतके गुलामगिरी पाहिली आणि भोगली. १९४७ नंतर काय झाले.
देशाला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त केले गेले, पण कॉंग्रेसच्या कुशासनामुळे लोकांना खरे स्वातंत्र्य अनुभवताच आले नाही, मोदी सन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे ती म्हणाली.
सनातनसाठीही मोदी सरकारने आम्हाला स्वतःच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पुढे केले. स्वातंत्र्याच्या वेळी भारताला हिंदू राष्ट्र का घोषित करण्यात आले नाही, असा सवाल तिने केला.
१९४७ मध्ये फाळणी झाली, ज्यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा जन्म झाला, तेव्हा भारताला हिंदू राष्ट्र का घोषित करण्यात आले नाही? असा सवाल करून ती म्हणाली की आता आम्ही भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या दिशेने काम करू.
मंडी मतदार संघात काँग्रेसचे हेवीवेट आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग यांच्या रूपाने त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. हिमाचलात १ जून रोजी मतदान होणार आहे.





